"पॉलिटेक्निक' प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मनस्ताप
कोल्हापूर - पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना आज मनस्ताप सोसावा लागला. प्रवेशासाठी सकाळी आठ वाजता विद्यार्थ्यांसह आलेल्या पालकांनी संथ गतीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत संताप व्यक्त केला. उद्या (ता. 15) प्रवेशाचा अंतिम दिवस असून, पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढवणार का?, अशी विचारणा होऊ लागली आहे.

प्रवेशासाठी तंत्रनिकेतनसह शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभाग व मानव्यशास्त्र अधिविभागात ऍप्लिकेशन रीसिव्हिंग सेंटर (एआरसी) केली आहेत.
गेल्या आठवडाभरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर झाली होती. त्यामुळे विद्यार्थी एआरसीकडे फिरकले नाहीत. पावसाचा जोर ओसरल्याने विद्यार्थ्यांनी एआरसीवर सकाळी आठपासूनच गर्दी केली. तंत्रज्ञान अधिविभागातील एआरसीवरील सर्व्हर डाऊन असल्याचे सांगण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. दुपारी पावणेदोन वाजता इथला सर्व्हर सुरू झाल्यानंतर सायंकाळी पाचपर्यंत दोनशे अर्जांची स्वीकृती झाल्याचे प्रा. महेश साळुंखे यांनी सांगितले. मानव्यशास्त्र इमारतीतील एआरसीमधील सर्व्हर डाऊन झाल्याचे सांगण्यात आल्याने पालकांनी संताप व्यक्त केला. तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश अर्ज स्वीकृती खोलीत चारच संगणक असल्याने प्रवेश प्रक्रियेची गती संथ राहिली. टोकन नंबर देऊन विद्यार्थ्यांकडून प्रवेशाची कागदपत्रे घेण्यात आली. विद्यार्थ्याकडे एखादे कागदपत्र अपूर्ण राहिले असेल, तर त्याला ते पुन्हा आणून द्यावे लागत होते. त्यामुळे त्याला पुन्हा रांगेतून यावे लागत होते. या एआरसीवर एकूण पंधराशे अर्जांची स्वीकृती झाल्याचे सांगण्यात आले.
एआरसीची संख्या वाढविण्याची गरज
कोल्हापूर जिल्ह्यात पॉलिटेक्निक फर्स्ट इयर, डायरेक्ट सेकंड इयर, डिप्लोमा फर्स्ट इयर, एमबीए, एमसीए, फार्मसी प्रवेश प्रक्रियेसाठी चार एआरसी आहेत. त्यातील शहरात तीन, तर गारगोटीत एक आहे. तेथे प्रवेश प्रक्रियेचा ताण येत आहे. त्यामुळे एआरसींची संख्या वाढविण्याची आवश्यकता असल्याचे जाणकारांतून सांगण्यात आले.