पोस्टमनकाका ‘बँके’तील पैसेही आणणार

पोस्टमनकाका ‘बँके’तील पैसेही आणणार

सांगली - ऊन, वारा आणि पाऊस याची तमा न करता टपाल पोहोच करणारा पोस्टमनकाका आता बॅंक प्रतिनिधीच्या रूपात तुम्हाला भेटेल. तुम्हाला घरबसल्या पैसे आणून देईल तसेच पैसे जमा देखील करेल. त्यासाठी पोस्टाने ‘इंडिया पोस्ट पेमेंटस्‌ बॅंक’ (आयपीपीबी) सुरू केली आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात पाच पोस्टात ही सुविधा एक सप्टेंबरपासून सुरू होईल. तर वर्षभरात सर्वच ४१८ टपाल कार्यालयात सुविधा मिळेल.

सांगलीचे प्रवर अधीक्षक ए. के. नाईक आणि प्रवर डाकपाल ए. के. साळोखे, आयपीपीबीचे शाखाधिकारी विनायक पासंगराव यांनी आज पत्रकार परिषदेत पेमेंट बॅंकेची घोषणा केली. ते म्हणाले, ‘‘पोस्टाच्या आयपीपीबी बॅंकेचे लोकार्पण एक सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथे होईल. त्यानंतर देशभरात ६५० शाखा आणि जवळपास ३२५० टपाल कार्यालयात सुविधा सुरू होईल. जिल्ह्यात मुख्य डाकघर तसेच कामेरी, भिलवडी, किर्लोस्करवाडी, टिंबर एरिया येथील डाकघरात या वित्तीय सेवेचा प्रारंभ होईल. वर्षअखेरपर्यंत सर्वच ४१८ शाखांमध्ये आयपीपीबी सेवा सुरू होईल. सांगलीत एक सप्टेंबरला खासदार संजय पाटील यांच्याहस्ते उद्‌घाटन होईल. 

आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, महापौर संगीता खोत,  जिल्हाधिकारी विजयकुमार काळम आदींची प्रमुख उपस्थिती असेल.’’
ते म्हणाले,‘‘पेमेंट बॅंकेत बचत खाते व चालू खाते अशा दोन सुविधा असतील. शून्य रकमेवर केवळ आधार क्रमांक आणि बायोमेट्रिकवर खाते उघडले जाईल. त्यासाठी पोस्टात जाण्याची गरजही भासणार नाही. पोस्टमन कोठेही तुमचे अकाऊंट उघडू शकेल. खाते उघडल्यानंतर तुम्ही घरबसल्या केवळ संदेश पाठवून पोस्टमनकडून पैसे मागवू शकता. तसेच पैसे भरू  शकता. त्यासाठी माफक दर असेल. ज्येष्ठ नागरिक, अपंग यांना याचा फायदा होईल. या खात्यातून सर्व प्रकारच्या वित्तीय व बॅंकिंग सुविधा मिळतील. खाते उघडल्यानंतर बॅंकेचे मोबाईल ॲप देखील घेता येईल. ॲपमधून मोबाईल रिचार्ज, लाईट बिल, डीटीएच सेवा आदी देयके देता येतील.’’

पेमेंट बॅंक म्हणजे
पेमेंट बॅंक म्हणजे आकाराने छोट्या असलेल्या बॅंका होय. ठेवी स्वीकारणे, मनी ट्रान्सफर या सुविधा दिल्या जातात. त्याचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना प्रत्यक्ष शाखेत जाण्याची गरज भास नाही. भविष्यात रेशनिंग, गॅस इतर शासकीय सबसिडी, रोहयोची देयक आयपीपीबी खात्यातून देण्याचा मानस आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com