पायाभूत विकासाकडे प्रभू एक्‍स्प्रेस सुपरफास्ट

पायाभूत विकासाकडे प्रभू एक्‍स्प्रेस सुपरफास्ट

जलदूत एक्‍स्प्रेस, विश्रामबाग उड्डाण पूल ठरले महत्त्वाचे प्रकल्प
मिरज - दोन पावले पुढे आणि एक पाऊल मागे असा रेल्वेचा प्रवास गेल्या वर्षभरात झाला. सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांतील रेल्वे प्रवाशांसाठी यंदाचे वर्ष यथातथाच गेले. नव्या गाड्यांचे लोकप्रिय निर्णय न घेता पायाभूत कामांची एक्‍स्प्रेस सुसाट सोडण्याकडे रेल्वेने लक्ष दिले. त्याची गोड फळे लगेच नसली तरी आगामी पाच वर्षांत चाखायला मिळणार आहेत. 

मिरजेत रेल्वेचा भव्य मॉल हा एकमेव महत्त्वाचा प्रकल्प प्रत्यक्षात येत आहे. जुन्या पंढरपूर रेल्वे स्थानकाच्या जागेत काम सुरू झाले असून पूर्णत्वानंतर शहराच्या सौंदर्यात आणि व्यापार क्षेत्रात भर पडेल. नव्या गाड्यांच्या बाबतीत हे वर्ष निराशादायी गेले. पंढरपूर मार्गावर लोकलसाठी चाचण्या झाल्या. त्या अयशस्वी ठरल्याने लोकल यार्डात सायडिंगला पडली आहे. मिरज-सोलापूर पॅसेंजर एक्‍स्प्रेसमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय प्रवाशांवर आर्थिक बोजा लादणारा ठरेल. कोल्हापूर-पुणे व मिरज-बेंगलुरु मार्गांवर नवीन गाड्या धावल्या नाहीत.

रेल्वेचा शेवटचा स्वतंत्र अर्थसंकल्प या वर्षाने अनुभवला. आगामी अर्थसंकल्प देशाच्या अर्थसंकल्पासोबत एकत्रच सादर होईल. त्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्राला कितपत न्याय मिळणार याची उत्सुकता व साशंकता असेल. तुलनेने शेवटच्या अर्थसंकल्पात सुरेश प्रभू यांनी अनेक नवे मार्ग व सर्वेक्षणांचे निर्णय जाहीर करून बासनात पडलेल्या प्रकल्पांना चालना दिली. पुणे-मिरज-लोंढा या मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या प्राथमिक कामाला एव्हाना सुरवातही झाली आहे. ३६२७ कोटी रुपयांच्या खर्चाला केंद्रीय मंत्रिगटाने मंजुरी दिली आहे. कोल्हापूर-वैभववाडी आणि कऱ्हाड-चिपळूण या नव्या मार्गांची अंमलबजावणीही मैलाचा दगड ठरणारी आहे. कऱ्हाड-चिपळूणसाठी एक धक्का आणखी मिळायला हवा. तुलनेने मिरज-बेंगलुरु आणि मिरज-सोलापूर मार्ग दुर्लक्षित राहिले. यंदाच्या वर्षभरात सर्वाधिक लक्षवेधी कामगिरी जलदूत एक्‍स्प्रेसने केली. टंचाईने प्राण कंठाला आलेल्या लातूरला जलदूतने दिलासा दिला. १११ फेऱ्यांतून २५ कोटी ९५ लाख लिटर पाणी पोहोचवले. जागतिक इतिहासात विक्रम करणारी कामगिरी जलदूतने नोंदवली. रेल्वे प्रशासनासाठी हा परीक्षेचा काळ होता; त्यात ते शंभर टक्के उत्तीर्ण झाले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांनी मोहिमेची दखल घेतली. मिरज-सांगली दरम्यान विश्रामबागमध्ये रेल्वे उड्डाण पुलाच्या उभारणीचा प्रारंभ हा एक महत्त्वाचा टप्पा या वर्षात नोंद घेण्यासारखा ठरला. मिरज-कृष्णाघाट हे तितकेच महत्त्वाचे रेल्वेगेट मात्र दुर्लक्षित राहिले आहे. एकूणच यंदाच्या वर्षात पायाभूत विकासाच्या मार्गावर प्रभू एक्‍स्प्रेस वेगाने धावली. 

२०१६ मध्ये रेल्वेचे बेरजेचे गणित...
पुणे-मिरज-लोंढा दुहेरीकरण व विद्युतीकरणाला केंद्रीय मंत्रिगटाची मंजुरी 
या कामासाठी ३ हजार ६२७ कोटींच्या खर्चासाठी मान्यता
विश्रामबागमध्ये रेल्वे उड्डाण पुलाचे बहुप्रतिक्षित काम मार्गी
जलदूतने १११ फेऱ्यांतून २५ कोटी ९५ लाख लिटर पाणी लातूरला पोचवत विश्‍वविक्रमी कामगिरी केली. 
कोल्हापूर-वैभववाडी मार्गाला मंजुरी मिळाल्याने कोकणाचे प्रवेशद्वार पश्‍चिम महाराष्ट्रासाठी खुले
कऱ्हाड-चिपळूण आणि लोणंद-बारामती मार्गांचे घोंगडे भिजतच

२०१६ मध्ये रेल्वेचे वजाबाकीच्या पानावर..
एकही नवी रेल्वे नाही
मिरज-सोलापूर लोकल अद्याप यार्डातच 
मिरज स्थानकातील पायाभूत सुविधांबाबत निराशा
मिरज-बंगळूर मार्गासाठीही नवे काही नाही
मिरज-कोल्हापूर मार्गावरही प्रवाशांची ससेहोलपट कायम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com