प्रकाशगडाचा बदलीचा कारभार अंधारातच 

mseb
mseb

कोल्हापूर - सरकार बदलले तरी महावितरणचा कारभार अजूनही "अर्थ'पूर्ण पद्धतीनेच चालत असल्याचे चित्र कायम आहे. प्रकाशगडचा कारभार पारदर्शी कधी होणार, अशी विचारणा सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या करताना अर्थपूर्ण व्यवहार होत असल्याचा आरोप करूनही त्याची दखल मात्र, मुख्यमंत्र्यांकडून घेतली जात नसल्याचे चित्र आहे. 

कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंतापद सध्या रिक्त आहे. या पदावर येण्यासाठी तिघे जण उत्सुक असून, या पदाच्या निवडीसाठी महावितरणचे एक वरिष्ठ अधिकारी कोल्हापूरला येऊन गेले आहेत. अजून निवड कोणाची होणार हे स्पष्ट नसले, तरी पूर्वी चार वर्षे कोल्हापुरात ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्याचीच वर्णी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यासाठी अर्थपूर्ण व्यवहार झाल्याची चर्चाही ऐकायला मिळते आहे. 

कोल्हापूर परिमंडळात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्याची वसुली चांगली आहे. शिवाय वीज गळती, वीज चोरीचे प्रमाणही अगदी नगण्य आहे. कोल्हापूरला असणाऱ्या अधिकाऱ्यांची पदोन्नतीने अमरावतीला बदली झाली; पण अवघ्या तासातच त्यांची बदली नाशिक येथे कशी झाली, याचे कोडे कोणालाच उलगडत नाही. 

प्रकाशगडावरून बदली, बढतीचे आदेश निघतात हे जरी खरे असले तरी पडद्यामागचे सूत्रधार वेगळेच आहेत. 

महावितरणचे "कलेक्‍टर' म्हणून त्यांची खास ओळख आहे. बदली होऊन सहा महिन्यांत त्याच अधिकाऱ्यांची त्यांना हवे त्या ठिकाणी बदली होण्याचे प्रमाण खूप आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापुरातील एका अधिकाऱ्याची बदली अवघ्या सहा महिन्यांत पुन्हा कोल्हापूरला झाली. प्रकाशगडवर एकाची बदली झाली होती. त्याला एका महिन्यातच त्याचे "कल्याण' केले. 

प्रकाशगडावरील एक प्रमुख गडकरी आणि त्याचे सहकारी बदली, बढतीच्या प्रकरणात अर्थपूर्ण व्यवहार करत असल्याचे सांगितले जाते. 

मुख्य अभियंता हे पद किती मोलाचे आहे, हे त्या ठिकाणी काम करणाऱ्यांनाच माहिती आहे. 

जे गडकरी अर्थपूर्ण व्यवहार करून कुणाचा तरी "दीप' लावतात त्यांच्या कारभाराची चौकशी व्हावी, अशी मागणी एका नागरिकाने मुख्यमंत्र्यांसह अन्य संबंधित अधिकारी आणि विरोधी पक्षनेत्यांकडे केली आहे; पण साधे उत्तर देण्याचे सौजन्यही दाखवलेले नाही. किंवा केलेले आरोप चुकीचे असल्याचेही स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे अर्थपूर्ण व्यवहारात कुठे तरी पाणी मुरते, असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे. 

कोल्हापुरात चार वर्षे ठाण मांडून बसलेला अधिकारीच पुन्हा मुख्य अभियंता म्हणून येत असल्याची चर्चा आहे. त्यांच्या चार वर्षाच्या कारभाराची चौकशी करण्याच्या मागणीचे उत्तर मुख्यमंत्री कार्यालयाने द्यायला हवे. कुणीतरी टीव्हीवरील ट्‌विट केले म्हणून चौकशीचे आदेश देणारे मुख्यमंत्री एका नागरिकाने केलेल्या तक्रारीकडे कसे दुर्लक्ष करू शकतात, असा प्रश्‍नही उपस्थित होऊ लागला आहे. 

अमावस्येचा मुहूर्त 
महावितरणचे वैशिष्ट्य म्हणा किंवा आणखी काही; पण आजपर्यंत बदली, बढतीच्या ऑर्डर अमावस्येच्या दिवशीच निघाल्या आहेत. दोन दिवसांत मुख्य अभियंत्याची ऑर्डर निघाली तर आश्‍चर्य वाटायला नको, अशी चर्चाही सुरू आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com