बार्शी येथील प्रशांत मते यांचे अपघाती दुर्दैवी मृत्यू

सुदर्शन हांडे
सोमवार, 2 एप्रिल 2018

वेळेत मिळाले नाहीत उपचार...
प्रशांत मते यांची गाडी मुरूमच्या ढिगाऱ्यावर जाऊन बाजूला पडलेल्या दगडांवर ते पडल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या-येणार्यांनी कोणीच लक्ष दिले नाही. जखमी महादेव देशमुख यांनी शुद्धीत आल्या नंतर बार्शी येथील मित्रांना फोन करून घडला प्रकार सांगितला. अपघाताचे नेमके ठिकाण लक्षात येत नव्हते. बार्शी येथून त्यांचे मित्र गेल्या नंतर पहाटे दोघांनाही दवाखान्यात नेले तो पर्यंत रक्तस्राव होऊन मते यांचा मृत्यू झाला होता.

बार्शी : येथील प्रशांत उर्फ बबडू मते यांचे रविवारी रात्री येरमाळा येथून यात्रेहुन परतत असताना अपघाती निधन झाले. ते ४० वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे. 

या बाबत अधिक माहिती अशी की, चैत्र पौर्णिमा निमित्त येरमाळ (जि. उस्मानाबाद) येथील येडेश्वरी देवीची यात्रा असते. या यात्रेस राज्यभरातून लाखो भाविक उपस्थित असतात. बार्शीतील प्रशांत मते व महादेव देशमुख हे दोघेही यात्रे निमित्त येरमाळा येथे गेले होते. येरमाळा येथून बार्शीकडे निघाले असता येरमाळा घाट उतरल्या नंतर त्याच्या मोटारसायकलला अपघात झाला. सध्या खामगाव -कोरेगाव या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने साईडपट्या खोल खादलेल्या आहेत. तर अनेक ठिकाणी मुरूम दगडाचे ढिगारे घातलेले आहेत. मात्र कोणत्याही ठिकाणी गाडी चालकांना सूचना देणारे फलक लावलेले नाहीत. रात्रीच्या अंधारात अपुरा उजेड व समोरून येणाऱ्या वाहनांच्या डोळ्यावरील प्रकाशामुळे मुरूम व दगडाच्या ढिगाऱ्याच्या अंदाज न आल्याने गाडी मुरूमच्या ढिगाऱ्यावर जाऊन प्रशांत मते यांचे डोके दगडावर आपटून रक्तस्राव होऊन  त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर महादेव देशमुख हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बार्शी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

वेळेत मिळाले नाहीत उपचार...
प्रशांत मते यांची गाडी मुरूमच्या ढिगाऱ्यावर जाऊन बाजूला पडलेल्या दगडांवर ते पडल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या-येणार्यांनी कोणीच लक्ष दिले नाही. जखमी महादेव देशमुख यांनी शुद्धीत आल्या नंतर बार्शी येथील मित्रांना फोन करून घडला प्रकार सांगितला. अपघाताचे नेमके ठिकाण लक्षात येत नव्हते. बार्शी येथून त्यांचे मित्र गेल्या नंतर पहाटे दोघांनाही दवाखान्यात नेले तो पर्यंत रक्तस्राव होऊन मते यांचा मृत्यू झाला होता.

Web Title: Prashant Mate dead in accident