वळवाने दिली कडाडत सलामी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

शहर, जिल्ह्यात जोरदार पावसाच्या सरी : वादळवारे, विजांच्या कडकडाटासह गारपीट; झाडे उन्मळून पडली 

कोल्हापूर : श्री जोतिबाची यात्रा झाल्यानंतर गुलाल धुऊन टाकण्यासाठी अगदी नियमाने येणाऱ्या वळीव पावसाने आज विलंबाने का होईना, शहर परिसरासह जिल्ह्यात जोराची हजेरी लावली. सोसाट्याचा वारा, कडाडणाऱ्या विजांचे तांडव आणि शुभ्र गारांचा सडा घालत वळवाने तप्त जमीन ओलीचिंब केली. एप्रिल संपून मे उजाडला तरी अद्याप एकही वळीव न झाल्याने त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांनी समाधानाचा सुस्कारा सोडला. या पावसाने शेतकरी वर्गही सुखावला. 

शहर, जिल्ह्यात जोरदार पावसाच्या सरी : वादळवारे, विजांच्या कडकडाटासह गारपीट; झाडे उन्मळून पडली 

कोल्हापूर : श्री जोतिबाची यात्रा झाल्यानंतर गुलाल धुऊन टाकण्यासाठी अगदी नियमाने येणाऱ्या वळीव पावसाने आज विलंबाने का होईना, शहर परिसरासह जिल्ह्यात जोराची हजेरी लावली. सोसाट्याचा वारा, कडाडणाऱ्या विजांचे तांडव आणि शुभ्र गारांचा सडा घालत वळवाने तप्त जमीन ओलीचिंब केली. एप्रिल संपून मे उजाडला तरी अद्याप एकही वळीव न झाल्याने त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांनी समाधानाचा सुस्कारा सोडला. या पावसाने शेतकरी वर्गही सुखावला. 

आज दुपारी साडेअकरा ते दुपारी तीनच्या दरम्यान उन्हाची तीव्रता वाढली. त्यानंतर ढगांची दाटी झाली. धुळीचे लोट उमटू लागले आणि सकाळपासून 38 डिग्रीवर स्थिरावलेला पारा झपाट्याने खाली आला. आज आर्द्रतेचे प्रमाण 24 टक्के तर वाऱ्याचा वेग 14 किलोमीटर प्रतितास राहिला. 

साडेचार ते पावणेपाच दरम्यान विजांचे तांडव सुरू झाले. त्यानंतर चार ते पाच वेळा परिसर दणाणून टाकणाऱ्या अन्‌ कानठळ्या बसविणाऱ्या विजांचा कडकडाट झाला आणि पावसाला सुरवात झाली. मृद्‌गंधाने वातावरण भरून गेले. काही क्षणातच रस्ते मोकळे झाले. पादचाऱ्यांनी झाडाखाली, दुकानांच्या शेडखाली आसरा घेतला. वाहनधारकांनीही वाहने जिथे असतील तेथे उभी करून निवारा शोधला. वारा थांबल्यामुळे सुरवातीपासून वळवाचा जोर राहिला. 

लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, उद्यमनगर, शिवाजी पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, गंगावेस, दुधाळीसह शहराच्या अन्य सखल भागांत पाणी साठले. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. महापालिकेने गटारींची स्वच्छता न केल्यामुळे पाण्याच्या लोटांसह गटारीतील पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे अनेक ठिकाणी दुर्गंधी पसरली. एमजी मार्केटमध्ये पाणी घुसले. प्रायव्हेट हायस्कूलशेजारी असलेल्या विद्युत खांबावर विजेच्या ठिणग्या उडून वीजपुरवठा खंडित झाला. कसबा बावडा, राजेंद्रनगर, राजारामपुरी, टाकाळा, विद्यापीठ परिसर, उपनगरातील भागात गारांचा वर्षाव झाला. आबालवृद्धांसह सर्वांनी गारा वेचून खाण्याचा आनंद एकमेकांशी "शेअर' केला. अनेकांनी ग्रुपने रस्त्यावर येऊन भिजण्याचा आनंद घेतला. मंगळवार पेठ, शिवाजी पेठ परिसरात फुटबॉलप्रेमींनी भर पावसातच फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला. भाजी, फळे, अन्य छोट्या वस्तू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची मात्र पावसामुळे धांदल उडाली. 

झाडे कोसळली; वीज पडली 
वीज पडल्यामुळे तीन ठिकाणी आग लागली. यामध्ये प्रतिभानगर बस रूट, अंबाई डिफेन्स कॉलनी, वाय. पी. पोवारनगर येथील ठिकाणांचा समावेश आहे; तर 16 ठिकाणी झाडे कोसळली. यामध्ये शिपुगडे तालीम परिसर, शालिनी पॅलेसची मागील बाजू, शाहूपुरी कुंभार गल्लीतील श्री पंचमुखी गणेश मंदिराजवळ, दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंगच्या बाजूला, उत्तरेश्‍वर पेठेतील धनवडे गल्ली, नागाळा पार्कमधील खानविलकर पेट्रोल पंपाशेजारी असणाऱ्या चिपडे सराफ दुकानाच्या बाजूला, निवृत्ती चौकातील नेताजी तरुण मंडळाजवळ, सासने मैदान, शाहू क्‍लॉथ मार्केटजवळील श्री गजेंद्रलक्ष्मी मंदिराजवळ, मटण मार्केट, वारणा कॉलनीचा समावेश आहे. महापालिका कर्मचाऱ्यांनी तातडीने झाडे दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. 

व्हॉटस्‌ऍप अन्‌ वळीव 
विजांचा कडकडाट, गारांचा वर्षाव अन्‌ वळीव सरी सुरू झाल्यानंतर अनेकांनी हा क्षण मोबाईलमध्ये शूट केला. फोटो, प्रत्यक्ष रेकॉर्डिंग अनेकांनी व्हॉटस्‌अपवरून एकमेकांना शेअर केले. काहींनी रस्त्यावर, गच्चीवर भिजत "सेल्फी'ही घेतले. 

...अन्‌ वळवाची हुलकावणी 
यावर्षी जानेवारीच्या मध्यापासूनच उन्हाने रंग दाखविण्यास सुरुवात केली होती. तुलनेने फेब्रुवारीही उष्ण राहिला. त्यानंतर मार्चच्या मध्यानंतर पाऱ्याने 37, 38 डिग्री सेल्सिअपर्यंत उसळी घेतली. मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून 30 एप्रिलपर्यंत तापमान 37 ते 42 डिग्री सेल्सिअस दरम्यान राहिले. वाढलेले तापमान, तापलेले भूपृष्ठ आदी घटकांची अनुकूलता निर्माण होऊनही वळीव कोसळला नव्हता. गेली तीन ते चार वर्षे कोल्हापूर जिल्ह्यात वळीव पावसाचे प्रमाण कमालीचे घटले आहे. गतवर्षी तर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात वळीव झाला. एरव्ही कोल्हापूर जिल्ह्यात मार्च ते मे दरम्यान चांगला वळीव होत असे. 

वळवाचा फायदा 
आंबा, रानमेवा आदी फळे पिकण्यासाठी तसेच भेगाळलेली जमीन नांगरण्यासाठी वळवाची गरज असते. याबरोबर उष्णतेच्या लाटांनी तप्त झालेले वातावरणही थंड होते. जास्त प्रमाणात वळीव झाल्यास जलस्रोतांमध्ये मॉन्सूनच्या आधी पुरेसा साठा निर्माण होतो. हे पाणी शेती, पिण्यासाठी पुरेसे ठरते. शिवाय माळरानावर खुरटे गवत उगवल्याने शेळ्या-मेंढ्या, म्हशी, गायींना चरण्यासाठी चाराही उपलब्ध होतो. 

आंब्याचे नुकसान 
आंब्याचे देशी वाण पिकण्यासाठी एखादा वळीव आवश्‍यक ठरतो. त्यानंतर आंबे भराभर पिकण्यास सुरुवात होतात; मात्र गारपिटीमुळे तयार झालेला आंबा जमिनीवर पडून नष्ट होतो. आज झालेल्या गारपिटीमुळे शहर परिसरात, जिल्ह्यात ठिकठिकाणी आंब्याचे नुकसान झाले. 

नायट्रोजनचे स्थिरीकरण 
विजांचा कडकडाट सुरू झाला की, द्विदल धान्याच्या मुळांवरील सूक्ष्म गाठीत समूहाने राहणारे ऍझेटोबॅक्‍टर नामक जीवाणू हवेतील नायट्रोजनचे स्थिरीकरण करतात. हा नायट्रोजन जमिनीचा पोत सुधारतो. यामुळे पिकांची वाढ चांगली होऊन उत्पादन भरपूर येते. यासाठी विजांचा कडकडाट हा महत्त्वाचा असतो. 

एसटी बसवर परिणाम नाही 
वळवामुळे मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणाऱ्या मध्यम, लांब पल्ल्यांच्या कोणत्याही गाड्यांवर परिणाम झाला नाही. यामुळे गाड्या रद्द केल्या नाहीत, अशी माहिती आगारातून देण्यात आली.