प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या अध्यक्षपदी शिराळ्याचे पाटील 

sadhashiv-patil
sadhashiv-patil

सांगली - सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी सत्ताधारी शिक्षक समितीचे संचालक सदाशिव पाटील (शिराळा) यांची आज निवड झाली. विरोधी शिक्षक संघाच्या थोरात गट संचालक शामगौंडा पाटील यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. सत्ताधारी गटाच्या श्री. पाटील यांना 13, तर विरोधी पाटील यांनी आठ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा सहकार उपनिबंधक कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी अमित गराडे यांनी काम पाहिले. 

श्री. पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी बॅंक कार्यालयासमोर फटाक्‍याची आतषबाजी केली. शिक्षक समितीचे नेते विश्‍वनाथ मिरजकर, समितीचे राज्य कोषाध्यक्ष किरणराव गायकवाड, किसन पाटील यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष श्री. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. मावळते अध्यक्ष उत्तमराव पाटील यांनी श्री. पाटील यांच्याकडे तातडीने पदभार दिला. बॅंक अध्यक्ष निवडीसाठी 6 जानेवारीला संचालकांची बोलावलेली बैठक सत्ताधारी संचालकांच्या गैरहजेरीमुळे स्थगित झाली होती. 

समितीने नेते विश्‍वनाथ मिरजकर म्हणाले, ""महिन्यांपासून बॅंकेतील विरोधकांनी सत्तेसाठी सुरू केलेला रडीचा खेळही सत्ताधारी संचालकांनी उधळला. रडून नव्हे तर लढून सत्तेवर यायची त्यांच्यात हिंमतच शिल्लक राहिलेली नाही. कर्मचाऱ्यांची ढाल करून सत्ताधारी गटाची बदनामी आणि सत्तेची स्वप्न पाहण्यात विरोधक धन्यता मानतात. हीन पातळीवर जाऊन विरोधकांच्या वाटचालीला सभासद केव्हाच स्वीकारणार नाहीत याची त्यांना आता तरी खात्री पटली असेल. शिक्षक बॅंकेचे कार्यक्षेत्र राज्य करण्याचा प्रस्ताव मंजूर होईलच. मात्र त्यातील विरोधकांचे अज्ञानही स्पष्ट होईल. आमच्या कर्तृत्वावर बॅंकेच्या पश्‍चिम महाराष्ट्रात शाखा वाढवू. मात्र तुमच्या कर्तृत्वाने तुम्हाला बॅंकेत सभासद संधीच देणार नाहीत.'' 

नूतन अध्यक्ष श्री. पाटील म्हणाले, ""अध्यक्ष निवडीत ज्यांनी विघ्न आणली, शिराळ्याच्या नागाला तुम्ही (विरोधकांनी) डिवचलं आहे. आता तो कधी दंश करेल, हे कळणारही नाही. सर्वांच्या सहकार्याने बॅंकेच्या प्रगतीसाठी प्रयत्न राहिल.'' 

जिल्हाध्यक्ष सयाजीराव पाटील, सरचिटणीस बाबासाहेब लाड, उपाध्यक्षा अर्चना खटावकर, शशिकांत भागवत, हरिबा गावडे आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com