प्रीतम पाटीलसह आईलाही अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 मार्च 2017

कोल्हापूर - बंगला विक्रीच्या व्यवहारातून संशयित प्रीतम पाटीलने ज्येष्ठ विचारवंत डॉ. कृष्णा किरवले यांचा खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न त्याच्याच आईने केला असल्याची माहितीही पोलिसांच्या हाती लागली. याच माहितीच्या आधारे राजारामपुरी पोलिसांनी प्रीतम पाटील व त्याची आई मंगला (वय 55) या दोघांना आज अटक केली. त्यांच्याकडून मोटारसायकल आणि रक्ताळलेला शर्ट जप्त केला.

डॉ. किरवले यांचा काल भरदिवसा खून झाला होता. घरात घुसून त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या मारेकऱ्याला पत्नीने प्रत्यक्ष पाहिले होते. प्रीतमचे नाव या प्रकरणात समोर आल्यानंतर राजारामपुरी पोलिस ठाण्यात त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. त्याचा पोलिसांनी शोध घेण्यास सुरवात केली. सात स्वतंत्र पथकांद्वारे शोधमोहीम सुरू झाली. काल रात्रीच त्याची आई, वडील, पत्नी या तिघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. प्राथमिक चौकशीत डॉ. किरवले यांचा बंगला खरेदीचा व्यवहार एक वर्षापूर्वी प्रीतम पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. हा व्यवहार 46 लाखांना ठरला. त्यातील 23 लाख ऍडव्हान्स व व्यवहारानंतर 23 लाख देण्याचे ठरले. यापैकी वेळोवेळी 35 लाख रुपये त्यांना दिले होते; मात्र ते फक्त 23 लाखच मिळाले असल्याचे सांगत होते. तसेच त्यांनी व्यवहाराची रक्कमही वाढवून मागितली होती. याच रागातून त्यांचा खून केल्याची कबुली पोलिसांसमोर प्रीतमने दिली.

सीबीआय चौकशी करा - आठवले
डॉ. कृष्णा किरवले यांच्या हत्येची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केली. या मागणीसाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू, असे ते म्हणाले.