भाजपकडून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते टार्गेट: पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan
Prithviraj Chavan

गडहिंग्लज - "भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना टार्गेट केले जात आहे. त्यांना कोणत्या तरी प्रकरणात अडकवून दहशत माजवण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. या विरोधात आता संघटित लढाई करावी लागणार आहे,'' असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत केले. तूर खरेदीत चारशे कोटींचा घोटाळा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले असले तरी यामध्ये किमान चार हजार कोटींचा घोटाळा असून त्याची सीबीआयतर्फे चौकशी करण्याची आमची मागणी असल्याचेही ते म्हणाले.

कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष बी. एन. पाटील-गिजवणेकर यांच्या अमृतमहोत्सवी गौरव सोहळ्याच्या निमित्ताने चव्हाण आज गडहिंग्लजच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी शिवराज महाविद्यालयात पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, "राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या प्रकरणात घोटाळा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले आहे. तूर खरेदीमध्ये मंत्र्यांपासून सरकारी अधिकारी आणि व्यापाऱ्यांपर्यंत संगनमताने घोटाळा झाला असण्याची शक्‍यता आहे. प्रचंड संशय यावा असे कृषी खात्याचे कामकाज सध्या सुरू आहे. तूर उत्पादनाचे आकडे दर पंधरा दिवसांनी बदलत आहेत. यामुळे सरकार झोपेत आहे की काय, असा प्रश्‍न पडत आहे. मोदी व फडणवीस सरकारने हमीभाव घोषित करूनही त्याची अंमलबजावणी केलेली नाही. तूर खरेदीत सट्टाबाजार चालत असल्याचा संशय आहे. एकीकडे राज्यात शेतकरी नाडला जात असताना मंत्री मात्र हवा खाण्यासाठी ऑस्ट्रेलियात जात आहेत. सरकारमधील इतका गलथानपणा गेल्या वीस वर्षात कधी पाहिला नव्हता. तूर घोटाळ्यात जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना बाजूला केले पाहिजे. 52 टक्के जनता शेतीवर आधारित असताना या सरकारचे कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष होणे गंभीर बाब आहे. भाजप सरकारने भरमसाठ घोषणा केल्या, पण अंमलबजावणी शून्य आहे. केवळ जाहिरात व शोबाजीवर भर दिला जात आहे. जनतेच्या पदरात ठोस काहीच पडलेले नाही."

चव्हाण म्हणाले, "संघर्ष यात्रेचा चौथा टप्पा रायगड व सिंधुदूर्ग जिल्ह्यात आजपासून सुरू होत आहे. राज्यातील सर्व जिल्ह्याला या यात्रेला स्पर्श केला आहे. राज्यात आज अनेक प्रश्‍न आहेत. परंतु संघर्ष यात्रेतून केवळ शेतकरी कर्जमाफीचा प्रश्‍न प्राधान्याने घेतला आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने केलेली कर्जमाफीची घोषणा अंमलात आणली. महाराष्ट्रापेक्षा उत्पन्न कमी असूनही तेथे कर्जमाफी दिली. फडणवीस सरकार आल्यापासून राज्यात नऊ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. सलग तीन वर्षे दुष्काळ आहे. उत्तर प्रदेशपेक्षा राज्यातील स्थिती बिकट असूनही अद्यापी कर्जमाफीची घोषणा हवेतच आहे. सुरूवातीला कर्जमाफीला विरोध करणारे फडणवीस मोदींच्या आश्‍वासनानंतर कर्जमाफी तत्वत: मान्य केली. परंतु त्यात चालढकल केली जात आहे. त्यासाठी योग्य वेळ कधी येणार, हा प्रश्‍न आहे. कर्जमाफीसाठी दिल्लीतून पैसे आणण्यात फडणवीस सरकारला अपयश आले आहे."

यावेळी प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस सुरेश कुराडे यांनी स्वागत केले. आमदार सतेज पाटील, शहराध्यक्ष बसवराज आजरी उपस्थित होते.

 शिवसेनेची भूमिका संभ्रमाची
चव्हाण म्हणाले, "संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर पहिल्यांदाच सर्व विरोधक एकत्र आले आहेत. शिवसेनाही विरोधाची भूमिका घेत कर्जमाफीचा मुद्दा रेटत आहे. परंतु त्याला फाटे फोडण्याचा प्रयत्नही ते करीत आहेत. काहीतरी वेगळे करण्याच्या प्रयत्नात ते आहेत. एकीकडे सत्ताही सोडत नाहीत आणि दुसऱ्या बाजूने विरोधक असल्याचे भासवित आहेत. यामुळे लोकांनी शिवसेनेवर किती विश्‍वास ठेवायचा, हा प्रश्‍न आहे."

 वाद मिटले पाहिजेत
पक्ष संघटनाबाबतच्या प्रश्‍नावर बोलताना चव्हाण म्हणाले,"संघटनेविषयी बोलण्याचा मला अधिकार नाही. तरीसुद्धा भाजपचे आक्रमण सुरू असताना कॉंग्रेसमध्ये फाटाफूट व्हायला नको होती. परंतु ती झाली. संघटना पातळीवरील सुधारणेसाठी नेत्यांमधील आपापसातील वाद संपविणे तितकेच गरजेचे आहे. वास्तविक भाजपालाही जनतेचा फार मोठा पाठिंबा आहे असे नाही. मतांची आकडेवारी पाहिली तर पन्नास टक्‍क्‍यांवर जनता त्यांच्या विरोधात मतदान केले आहे. यामुळे भाजपाला फार मोठे यश मिळाले आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com