'डाळिंबावरील प्रक्रियेसाठी राज्यात दहा प्रकल्प उभारू '

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 मे 2017

सोलापूर - डाळिंबाची क्षेत्रवाढ आणि उत्पादनवाढ लक्षात घेता त्याचे मूल्यवर्धन महत्त्वाचे आहे. डाळिंबाच्या दाण्यासह सालीपर्यंत सगळ्याचा प्रक्रियेसाठी होणारा उपयोग लक्षात घेता प्रक्रिया उद्योग गरजेचा आहे. शास्त्रज्ञांनी त्यासाठीचे तंत्रज्ञान द्यावे, आम्ही येत्या दोन वर्षांत राज्यात दहा ठिकाणी प्रक्रिया प्रकल्प उभा करू, असे आश्‍वासन राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी (ता. 30) येथे दिले. 

सोलापूर - डाळिंबाची क्षेत्रवाढ आणि उत्पादनवाढ लक्षात घेता त्याचे मूल्यवर्धन महत्त्वाचे आहे. डाळिंबाच्या दाण्यासह सालीपर्यंत सगळ्याचा प्रक्रियेसाठी होणारा उपयोग लक्षात घेता प्रक्रिया उद्योग गरजेचा आहे. शास्त्रज्ञांनी त्यासाठीचे तंत्रज्ञान द्यावे, आम्ही येत्या दोन वर्षांत राज्यात दहा ठिकाणी प्रक्रिया प्रकल्प उभा करू, असे आश्‍वासन राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी (ता. 30) येथे दिले. 

सोलापुरातील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र व सोसायटी फॉर ऍडव्हान्समेंट ऑफ रिसर्च ऑन पोमग्रेनेटच्या (सार्प) वतीने आयोजित राष्ट्रीय डाळिंब परिसंवादाचा समारोप, डाळिंब संशोधन केंद्राच्या वतीने नव्याने विकसित केलेल्या सोलापूर लाल व सोलापूर अनारदाणा या दोन वाणांचे प्रसारण आणि शेतकरी प्रशिक्षण व निवास केंद्राचे उद्‌घाटन देशमुख यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. टी. महापात्र, भारतीय फलोत्पादन संस्थेचे अध्यक्ष डॉ. के. एल. चढ्ढा, अखिल भारतीय डाळिंब संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. के. पाल आदी या वेळी उपस्थित होते. 

देशमुख म्हणाले, ""डाळिंबासारख्या पिकात जगभरात भारताचा वाटा 60 टक्‍क्‍यांपर्यंत आहे. त्यात सर्वाधिक महाराष्ट्र आणि त्यातही सोलापूरचे नाव घेतले जाते. कोरडवाहू आणि कमी पाण्यावरील शेतकऱ्यांसाठी डाळिंब हे फळ फायदेशीर आहे. त्या दृष्टीने परिपूर्ण ज्ञान शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे. शास्त्रज्ञांनी नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याची गरज आहे. शास्त्रज्ञ आणि शेतकऱ्यांतील संवाद जेवढा वाढेल, तेवढे अधिक चांगले काम होणार आहे. शेतकऱ्यांनीही आता डोळसपणे शेती करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, हा राज्य व केंद्र शासनाचा प्रयत्न आहे. राज्यातील नागपूर, मुंबई, औरंगाबाद, पुणे या विमानतळांसह जेएनपीटीसारख्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी सुविधा केंद्रे उभारणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोलणे झाले आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळेल. डाळिंब संशोधन केंद्रानेही प्रक्रिया उद्योगाचा स्वतंत्र प्रस्ताव द्यावा.'' 

सहा भाषांतील मोबाईल ऍप 
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने तयार केलेल्या सहा भाषांतील मोबाईल ऍपचे अनावरणही या वेळी झाले. गुगल प्ले स्टोअरवरून मोफत हे ऍप उपलब्ध होणार असून, डाळिंब केंद्रातील शास्त्रज्ञांसह विविध प्रयोग आणि संशोधनांची माहिती यावर उपलब्ध आहे. डाळिंबाची लागवड, खत व पाणी व्यवस्थापनासह कीड-रोगांच्या प्रतिबंधासंबंधी सर्वंकष माहिती यामध्ये आहे. विशेष म्हणजे सहा भाषेत ती उपलब्ध आहे.