shivajiuniversity
shivajiuniversity

'शिवाजी विद्यापीठाशी जोडल्याचा आनंद'

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाशी सामंजस्य करार करून महाराष्ट्रातील एका अत्यंत यंग, बोल्ड आणि डायनॅमिक -विद्यापीठाशी संबंध जोडले गेल्याचा आनंद मोठा आहे, अशी प्रतिक्रिया यु. के. स्थित पोर्टसमाऊथ विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. पाल अहलुवालिया यांनी आज येथे व्यक्त केली. 

पोर्टसमाऊथ विद्यापीठ व ऑस्ट्रेलियाच्या वॉलन्गॉन्ग विद्यापीठांशी शिवाजी विद्यापीठाचे सामंजस्य करार आज सकाळी करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, वॉलन्गॉन्ग विद्यापीठाच्या दुबई कॅम्पसचे प्रा. विजय परेरा प्रमुख उपस्थित होते. 

पोर्टसमाऊथ विद्यापीठाचे संयुक्त संशोधन केंद्र शिवाजी विद्यापीठाच्या कॅम्पसवर उभे करण्याबाबत उभय विद्यापीठांनी तत्त्वतः मान्यता दिली असल्याचे सांगून प्रा. अहलुवालिया म्हणाले, ""शिवाजी विद्यापीठाने संशोधन प्रकल्पांसह संशोधन पत्रिकांतून प्रकाशित केलेले शोधनिबंध अत्यंत उल्लेखनीय आहेत. कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठातील प्राध्यापक, संशोधकांनी चालविलेली कामगिरीही लक्षणीय आहे. पोर्टसमाऊथ व शिवाजी विद्यापीठ विविध आघाड्यांवर एकत्रित काम करू शकते. संयुक्त संशोधनाच्या अनेक शक्‍यता व संधी त्यातून पुढे येतील.'' 

प्रा. परेरा म्हणाले, ""आजचा सामंजस्य करार हा ऑस्ट्रेलियन वॉलन्गॉन्ग विद्यापीठाच्या केवळ कॅम्पसपुरता मर्यादित नसून या विद्यापीठाशी संलग्नित सर्व कॅम्पसशी संबंधित असेल. त्यामुळे संशोधन व शैक्षणिक सहकार्याच्या अमर्याद संधी दोन्ही विद्यापीठांसाठी याद्वारे खुल्या झाल्या आहेत. त्याचा दोन्ही विद्यापीठांना मोठा लाभ होणार आहे. दुबई, ऑस्ट्रेलिया व भारत या तिन्ही देशांतील शैक्षणिक व संशोधकीय परस्पर संबंध दृढ होण्यास मदत होईल.'' 

करारांवर विद्यापीठाकडून कुलसचिव डॉ. व्ही. डी. नांदवडेकर यांनी तर पोर्टसमाऊथ विद्यापीठातर्फे प्र-कुलगुरू प्रा. अहलुवालिया आणि वॉलन्गॉन्ग विद्यापीठातर्फे प्रा. परेरा यांनी स्वाक्षरी केल्या. बीसीयुडीचे संचालक डॉ. डी. आर. मोरे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, आयक्‍यूएसीचे संचालक डॉ. आर. के. कामत, आंतरराष्ट्रीय समन्वय कक्षाचे संचालक डॉ. ए. व्ही. घुले, प्रा. पी. ए. अत्तार, प्रा. विजय ककडे, प्रा. विजय फुलारी, प्रा. पी. एस. पाटील, प्रा. वासंती रासम, प्रा. ज्योती जाधव, डॉ. जे. एस. बागी उपस्थित होते. 

एकाच वेळी दोन आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी प्रथमच सामंजस्य करार होत असल्याबद्दल समाधानी आहे. पोर्टसमाऊथचे संशोधन केंद्र शिवाजी विद्यापीठ कॅम्पसवर उभे करण्यास उभय पक्षांनी तत्त्वतः मान्यता दिली असून, त्या दिशेने टप्प्याटप्प्याने वाटचाल करण्यात येणार आहे. कराराद्वारे विद्यापीठांमधील विज्ञान, मानव्यविद्या, सामाजिक विज्ञान, भाषा या विद्याशाखांमध्ये परस्पर सहकार्य संबंध प्रस्थापित होतील. 
डॉ. देवानंद शिंदे  कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com