‘रयत’ कर्मवीरांची प्रयोगशाळा 

‘रयत’ कर्मवीरांची प्रयोगशाळा 

कोल्हापूर - कोणताही शिक्षणग्रंथ न वाचता शिक्षण क्षेत्रात नवीन प्रयोगांची नांदी घडविणारे कर्मवीर भाऊराव पाटील हे शिक्षणतज्ज्ञांचे महर्षी होते; तर रयत शिक्षण संस्था ही त्यांच्या यशस्वी प्रयोगांची प्रयोगशाळा ठरली, असे गौरवोद्‌गार ज्येष्ठ नेते व विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी आज येथे काढले. शिवाजी विद्यापीठाचा यंदाचा प्राचार्य आर. के. कणबरकर पुरस्कार साताऱ्याच्या रयत शिक्षण संस्थेस प्रदान झाला. 

या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. डॉ. अनिल पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेतर्फे पुरस्कार स्वीकारला. कुलगुरू डॉ. शिंदे यांनी त्यांना पुरस्कार प्रदान केला. १ लाख ५१ हजार रुपये रोखे, मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

डॉ. पाटील म्हणाले, ‘‘कर्मवीरांनी शिक्षणाच्या क्षेत्रात अभूतपूर्व प्रयोग केले. या प्रयोगांमुळे समाजातल्या तळागाळातल्या, गोरगरीब, दलित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सामील होणे शक्‍य झाले. खेड्यापाड्यांतल्या मातीतली रत्ने त्यांनी गोळा केली आणि त्यांच्या माध्यमातून समतेची रचना केली. रा. कृ. कणबरकर यांना अण्णांनी बेळगावहून साताऱ्याला शिवाजी महाविद्यालयात इंग्रजी विभागप्रमुख म्हणून आणले. त्यांना कऱ्हाडच्या संत गाडगे महाराज महाविद्यालयाचा प्राचार्यही केले. अण्णांचा कणबरकरांना साताऱ्याला आणण्याचा निर्णय त्यांच्या कारकिर्दीवर दूरगामी परिणाम करणारा ठरला. महाराष्ट्राचे व्यापक कार्यक्षेत्र कणबरकरांना लाभले आणि आपली लेखणी, वाणी बहुजनांच्या उद्धारासाठी वापरून त्यांनी नवी महाविद्यालये आणि विद्यार्थी घडविले. कणबरकर नेकदार, सरळमार्गी व सर्जनशील वृत्तीचे होते. राजर्षी शाहू महाराजांविषयीचा जिव्हाळा हा आम्हा दोघांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा होता.’’

रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील म्हणाले, ‘‘आजवर रयत शिक्षण संस्थेला अनेक पुरस्कार मिळाले; पण शिवाजी विद्यापीठाकडून प्रदान झालेला पुरस्कार सर्वश्रेष्ठ आहे. कारण या भूमीने आम्हाला कर्मवीर दिले. १९०२ ते १९०७ या कालावधीत अण्णा कोल्हापुरात जैन बोर्डिंगमध्ये शिकण्यासाठी राहिले होते; तर अखेरचे वर्ष त्यांना राजर्षी शाहू महाराजांसमवेत राजवाड्यातच व्यतीत करण्याची संधी लाभली. महात्मा फुले, महात्मा गांधी आणि शाहू महाराज यांना त्यांनी गुरू मानले आणि त्यांच्या विचारांना  कृतीचे स्वरूप देण्यात अण्णा यशस्वी झाले. राजर्षी शाहू महाराजांचे सर्व जातिधर्माच्या विद्यार्थ्यांसाठी एकत्र वसतिगृह काढण्याचे स्वप्न कर्मवीरांनी पुढे पूर्ण केले. म्हणून या भूमीचा हा पुरस्कार महत्त्वाचा आहे. या बदलत्या परिस्थितीमध्ये रयत शिक्षण संस्था ध्येयापासून तसूभरही न ढळता शैक्षणिक कार्य करीत आहे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, कौशल्य विकास, रोजगाराभिमुखता या गोष्टींना या नवव्यवस्थेत महत्त्व आले आहे. त्या दृष्टीने शिक्षणक्रमात कालसुसंगत बदल करून विद्यार्थी घडविण्याला रयतचे प्राधान्य आहे. त्याच वेळी विनाअनुदानितसारखी कितीही संकटे आली तरी, आदिवासी, ग्रामीण पाड्यांपर्यंत शिक्षणाची गंगा नेण्याचे व्रत संस्था कधीही सोडणार नाही. 

या वेळी प्राचार्य कणबरकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारी चित्रफीत दाखविण्यात आली. कार्यक्रमास विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. एन. जे. पवार, माजी प्र-कुलगुरू डॉ. व्ही. एम. चव्हाण, डॉ. बी. पी. साबळे, श्रीमती शालिनी कणबरकर, पुरस्कार निवड समितीचे सदस्य डॉ. जे. एफ. पाटील, डॉ. भालबा विभूते उपस्थित होते. प्राचार्य बी. ए. खोत यांनी स्वागत केले. प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी मानपत्राचे वाचन केले. डॉ. अरुण कणबरकर यांनी कणबरकर कुटुंबीयांतर्फे मान्यवरांचा सत्कार केला. रसिया पडळकर यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.

रयत शिक्षण संस्थेस प्रदान होत असलेला हा पुरस्कार म्हणजे कर्मवीर अण्णांच्या संस्कारांचा सत्कार आहे. कर्मवीरांनी शिक्षण आणि श्रमसंस्काराचे मूल्य समाजमनात रुजविले. श्रमसंस्कारातून गरीब, मागास विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण केलेला आत्मविश्‍वास महत्त्वाचा आहे. कित्येक वंचित, शोषित समाजघटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कर्मवीरांचे कार्य हे ‘भारतरत्न’च्या तोडीचे आहे. त्या दृष्टीने कर्मवीर भारतीय नवसमाजाचे रचनाकार होते.
- डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com