'तंत्रनिकेतन'साठी सोलापुरात आंदोलन : 100 जणांना अटक व सुटका

शीतलकुमार कांबळे
मंगळवार, 11 एप्रिल 2017

श्रेणी वाढविण्याच्या नावाखाली येथील डिप्लोमा अभ्यासक्रम बंद करून येथे अभियांत्रिकीचे पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

सोलापूर : येथील शासकीय तंत्रनिकेतन बंद होऊ नये म्हणून आज (मंगळवार) सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी जीपी कृती समितीच्या सुमारे शंभर सदस्यांना ताब्यात घेतले. नंतर त्यांना सोडून देण्यात आले. 

शासनाने सोलापूर, लातूरसह राज्यातील सहा ठिकाणची तंत्रनिकेतन महाविद्यालये बंद करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. ऑक्टोबर 2016 मध्ये हे आदेश काढण्यात आले असून, श्रेणी वाढविण्याच्या नावाखाली येथील डिप्लोमा अभ्यासक्रम बंद करून येथे अभियांत्रिकीचे पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण समितीने (AICTE) येथे येऊन पाहणीही केली आहे. 

'जीपी बंद होऊ देणार नाही, पालकमंत्री होश मे आओ, पुलिस की दादागिरी नहीं चलेंगी' अशा घोषणा आंदोलनावेळी देण्यात आल्या. या आंदोलनासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र, तरीही आंदोलन करण्यात आले. त्यामुळे पोलिसांनी सुमारे 100 सदस्यांना ताब्यात घेतले. नंतर त्यांना सोडून देण्यात आले. 

दरम्यान, पालकमंत्री देशमुख यांनी संध्याकाळी डाक बंगला येथील शासकीय विश्रामगृहामध्ये कृती समितीच्या आंदोलकांना चर्चेसाठी बोलावले आहे. देशमुख यांच्याकडे सोलापूरच्या पालकमंत्रिपदाशिवाय सार्वजनिक बांधकाम, वाहतूक, कामगार आणि कापड उद्योग खात्याच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी आहेत.