अवैध दारू व्यवसायाबद्दल 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद - चंद्रशेखर बावनकुळे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

राळेगणसिद्धी - 'ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सर्व सूचना ऐकून त्याप्रमाणे ग्रामरक्षक दल कायद्यात सुधारणा करण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. याबाबत 95 टक्के काम झाले असून, राहिलेले काम जुलैपर्यंत पूर्ण होईल. अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यास 10 वर्षे शिक्षेची तरतूद त्यात केली जाईल,'' असे उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सांगितले.

बावनकुळे यांनी दुपारी हजारे यांची येथे भेट घेतली. या भेटीत त्यांची ग्रामरक्षक दल कायद्याबाबत चर्चा झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत हजारे व बावनकुळे बोलत होते.

बावनकुळे म्हणाले, 'ग्रामरक्षक दलाच्या माहितीनंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी 12 तासांत घटनास्थळी पोचून कारवाई करण्याची तरतूद प्रस्तावित कायद्यात आहे. ग्रामरक्षक दल स्थापण्याची नगर जिल्ह्यापासून सुरवात केली आहे. जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये 30 जूनपर्यंत ग्रामरक्षक दल स्थापन करण्यात येईल.

याबाबत 15 जून रोजी राळेगणसिद्धी येथे पहिली बैठक होईल. आगामी दोन वर्षांत राज्यभर ग्रामरक्षक दलाची स्थापना केली जाईल. ग्रामरक्षक दलाला सहकार्य न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट प्रशासकीय कारवाईची तरतूद कायद्यात आहे.''

"गावात जाऊन काम करणारे पहिले मंत्री,' अशा शब्दांत बावनकुळे यांचे कौतुक करून हजारे म्हणाले, 'ग्रामरक्षक दलाची स्थापना, त्यांना द्यावयाचे विशेष अधिकार याबाबत काही मुद्दे राहिले होते. ते पूर्ण करून सुधारित विधेयकाला बावनकुळे यांनी मान्यता दिली आहे.''

शेतातच सौरऊर्जा निर्मिती
सौरऊर्जेवर वीजनिर्मिती करण्यावर भर देणार असल्याचे सांगून बावनकुळे म्हणाले, 'शेतकऱ्यांना वीज देताना सरकारला चार रुपये तोटा सोसावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे समूह तयार करून शेतातच सौरऊर्जानिर्मिती करणार आहोत. त्याची सुरवातही राळेगणसिद्धीतून करू. त्याचे भूमिपूजन लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केले जाईल.''