हिंदुस्थानी संगीताला हवा  शासनाचा सकारात्मक सूर 

pt-ulhas-kahalkar
pt-ulhas-kahalkar

सांगली - संगीतातले बदलते ट्रेंड म्हणा किंवा शासनाची उदासीनता म्हणा...यामुळे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताकडे सध्या दुर्लक्ष आहे. ही संस्कृती जतन करून अधिक वेगाने प्रवाही करण्यासाठी शासनाचे पाठबळ गरजेचे आहे, असे मत हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायक पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. संगीत किंबहुना सर्वच क्षेत्रात सध्या झटपट यशासाठी सारे धावताहेत. मात्र हे यश अल्पकाळासाठी असतं. कोणतंही शिक्षण घेण्यासाठी त्यातील तपश्‍चर्या महत्त्वाची ठरते. ती तपश्‍चर्या गुरुकुल पद्धतीच्या शिक्षणातून मिळवता येते. इथं शिकलेल्यांचा ठसा चिरकाल समाजात कायम राहतो. त्यामुळे गुरुकुलचे शिक्षण संगीताला नक्कीच ऊर्जितावस्था देईल, असा अशावादही त्यांनी व्यक्त केला. 

हिंदुस्थानी रागसंगीताची परंपरा प्रवाहित ठेवण्यात पंडित कशाळकर यांचे मोठे योगदान आहे. संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानच्या "गुरुकुल' संगीत विद्यालयाच्या नूतन वास्तुच्या उद्‌घाटन प्रसंगी ते सांगलीत आले होते. त्यावेळी त्यांनी "सकाळ'शी संवाद साधला. 

पं. कशाळकर सध्या बांग्लादेशातील ढाका येथे गुरुकुल पद्धतीचे शिक्षण देतात. शिवाय पुण्यातील गुरुकुलमध्येही ते गुरुवर्य आहेत. ही रागसंगीताची परंपरा कशी प्रवाहित होत गेली. यावर पं. कशाळकर म्हणाले,""आजवर भारतात व परदेशांतील अनेक मोठ्या संगीत महोत्सवांत भाग घेतला. त्यात ऑस्ट्रेलियातील बहुसांस्कृतिक महोत्सव, "ऍमस्टरडॅम' भारत महोत्सवांचा समावेश आहे. बांग्लादेशातील महोत्सवात हजारो श्रोते उपस्थित रहातात. त्यांना याची आवड होते आहे. पश्‍चात्य देशात, तर संगीताचे बालपणापासून शिक्षण दिले जाते. संगीतशास्त्राची परंपरा असलेल्या भारतात मात्र तसे होत नाही. यासाठी आम्हा जणकारांची जबाबदारी अधिक वाढते. आम्ही मिळवलेली विद्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी मी ठिकठिकाणी गुरुकुलमध्ये शिकवतो. बांगलादेशातील गुरुकुलमध्ये मुस्लिम समाजातील तरुणही मोठ्या संख्येने सहभागी झालेत. त्यांच्याकडेही उपजत ही कला आहे. नक्कीच मला त्यांच्याकडून यश मिळेल. ही रागसंगीताची परंपरा प्रवाहित करण्यासाठी शालेय अभ्यासक्रमातही उशिरा का होईना संगीताचा समावेश केला. पण, ही परंपरा प्रवाही ठेवण्यासाठी नावीण्यपूर्ण उपक्रमांची गरज शासनाकडून आहे.'' 

पं. कशाळकर यांना पं. गजाननबुवा जोशी यांच्याकडून ख्यालगायकीची बहुपिढी समृद्ध परंपरा लाभली, तर पं. राम मराठे यांच्याकडून बुद्धिप्रवण गायकीची प्रेरणा मिळाली आहे. कोलकाता येथील आय. टी. सी. संगीत संशोधन अकादमीत पं. कशाळकर यांनी 1993 मध्ये आचार्यपद स्वीकारले. ते तिथे ग्वाल्हेर घराण्याच्या गुरूपदावर कार्यरत आहेत. त्यांची ग्वाल्हेर घराण्यासोबत आग्रा आणि जयपूर या घराण्यांच्या गायनपद्धतींवर हुकमत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिष्य झाले आहेत व तयार होत आहेत.

याविषयी सांगताना ते म्हणाले,""मी स्वतः नागपूर विद्यापीठातून सर्वोच्च गुण मिळवून संगीताच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात सुवर्णपदक मिळवले. मात्र महाविद्यालयीन अभ्यासक्रमात संगीताचं पुस्तकी ज्ञान अवगत होतं. ते आत्मसात करण्यासाठी गुरुकुलमध्येच जावं लागले. वडिलांकडून आलेला संगीताचा वारसा मी जतन करण्यासाठी गुरुकुलमध्ये प्रवेश केला. खर तर इथेच स्वर आणि ताल यांचा पाया भक्कम झाला. त्यामुळेच गायिकी प्रगल्भ झाली. यासाठी गुरुकुल शिक्षणाची गरज आहे. तपश्‍चर्यातूनच कलाकार घडतो. सांगलीतील या गुरुकुलकडेही माझे लक्ष राहील. इथूनही चांगले कलकार तयार होतील, अशी अशा आहे.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com