सार्वजनिक ठिकाणे महिलांसाठी असुरक्षितच... 

सार्वजनिक ठिकाणे महिलांसाठी असुरक्षितच... 

सातारा - अलीकडच्या काळात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात खरोखरच महिला-युवती किती सुरक्षित आहेत, असा प्रश्‍न पडतो. या अनुषंगाने साताऱ्यातील निवडक तनिष्कांनी "स्टिंग ऑपरेशन' करून सातारा शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसर, तहसीलदार कार्यालय परिसर, राजवाडा बस स्थानक यांसह शाळा व महाविद्यालयांचा परिसर अशी सार्वजनिक ठिकाणे महिला व युवतींसाठी असुरक्षित असल्याची निरीक्षणे नोंदविली. काही उदाहरणांतून कथित पुरोगामित्वाचा बुरखा फाडला गेला आणि पुढे आले "पुरुषी मानसिकते'चे वास्तव! 

जागतिक महिलादिनाच्या पार्श्‍वभूमीवर साताऱ्यातील तनिष्कांनी शहराच्या विविध भागांत काही वेळ व्यतित करून "सायलंट ऑब्झर्वर' म्हणून काम केले. 

स्टिंग ऑपरेशनमध्ये आढळलेली निरीक्षणे... 

लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, भवानी हायस्कूल, सुशीलाबाई साळुंखे गर्ल्स हायस्कूलजवळ मुलांची कोंडाळी उभी असतात. येणाऱ्या-जाणाऱ्या मुलींना या कोंडाळ्यातून शेलके शेरे ऐकावे लागतात. अपशब्द वापरणे, चिडवणे, पाठलाग करणे, गाड्यांचे टर्रटर्र फायरिंग काढत मुलींच्या शेजारून कट मारून पटकन जाणे असे प्रकार नित्याचेच झाले आहेत. 

शाळा-कॉलेज-क्‍लासेस बाहेर कोंडाळी 
कन्याशाळेमागे शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेला तसेच क्‍लासच्या वेळात काही युवकांची कोंडाळी उभी असतात. अनंत इंग्लिश स्कूलचा कोपरा, न्यू इंग्लिश स्कूल चौक, अण्णासाहेब कल्याणी हायस्कूल याठिकाणीही कोंडाळी असतात. संभाजीनगरमधील भारत विद्यामंदिरबाहेर शाळेच्या वेळेआधी, सुटल्यानंतर देखील मुलांची भांडणे, छेडछाड असे प्रकार पाहायला मिळतात. 

मुख्य बस स्थानक टवाळांचा अड्डा 

साताऱ्यातील मुख्य बस स्थानक हा टवाळखोरांचा अड्डा झालेला आहे. महाविद्यालये भरण्याच्या व सुटण्याच्या वेळात युवकांचे गट बस स्थानकावर गटागटाने उभे असतात. मुलींचे मोबाईल क्रमांक मिळवून त्यांना वारंवार दूरध्वनी करून सतावणे, "तुला मी ओळखतो' असे म्हणून भेटायला येण्याची गळ घालणे अशा प्रकारे त्रास दिला जातो. ग्रामीण भागात जाणाऱ्या बस फेऱ्यांमध्ये मुलींना या अशा टवाळांचा अधिक उपद्रव सहन करावा लागतो. वाहकाला उद्देशून काहीबाही बोलणे, मोबाईलवर विशिष्ट रिंगटोन किंवा गाणी वाजवत मुलींकडे टकमक बघणे असे प्रकार चालतात. 

गर्दीतील चोरटा स्पर्श 

सार्वजनिक ठिकाणी, विशेषत: गर्दीच्या वेळी अनामिकांचा चोरटा स्पर्श महिला व युवतींना प्रचंड त्रासदायक ठरतो. बसमधील गर्दीत असे चोरटे स्पर्श प्रवास नकोसा करतात. भाजी मंडईसारखी ठिकाणेही या सडकछाप रोमिओंपासून सुटलेली नाहीत. 

रस्ते सर्वाधिक असुरक्षित 
शहराच्या भोवतालच्या उपनगरांत महिलांच्या अंगावरील दागिने ओढून नेण्याचे प्रकार सर्रास घडतात. सदरबझार, रिमांड होम, कॅप्टन शिंदे चौकी, मोना स्कूल परिसर, शाहूपुरी, शाहूनगर हा भाग शहराच्या गर्दीपासून थोडा बाहेरच्या बाजूस असल्याने या भागातील रस्त्यांवर तुलनेने कमी वर्दळ असते. याचा फायदा चोर-उचक्के घेतात. दुचाकीवरून पाठीमागून येऊन सोनसाखळी खेचण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे रस्त्यावरून चालताना महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. 

पोलिसांबरोबरच समाजाचीही जबाबदारी 

सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसिंग वाढले पाहिजे. पोलिसांच्या फिरत्या पथकांचे पेट्रोलिंग शाळा-महाविद्यालय परिसरात वाढले पाहिजे. सर्व जबाबदारी पोलिसांवर झटकून कोणालाही मोकळे होता येणार नाही. समाजाचाही त्यात सहभाग हवा. शाळा-महाविद्यालय व्यवस्थापनांनी महाविद्यालयांबाहेरील रस्त्यांवर अधिक चांगल्या क्षमतेचे कॅमेरे लावावेत. जेणेकरून पोलिस अधून-मधून या फुटेजचा वापर टवाळाखोरांवर कारवाई करण्यासाठी करू शकतील. कारवाई होते हे लक्षात आले की, टवाळखोरीही कमी होण्यास मदत होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com