जनसंपर्काच्या बळावर तांबेंची विजयाची हॅटट्रिक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

थोरात यांना विजयाची भेट 
डॉ. सुधीर तांबे यांची पत्नी संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष दुर्गा तांबे, बाळासाहेब थोरात यांच्या भगिनी आहेत. आज (मंगळवारी) थोरात यांचा वाढदिवस आहे. विजयाची हॅटट्रिक करून मेहुण्यांना डॉ. तांबे यांनी ही वाढदिवसाची भेटच दिली आहे. 

नगर : मातब्बरांचे पाठबळ व व्यापक जनसंपर्काच्या बळावर विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवत हॅटट्रिक साधली. 

नाशिक पदवीधर मतदार संघात नव्या याद्यांच्या रचनेमुळे यावेळी मतदारांची संख्या थेट अडीच लाखांवर गेली होती. मतदारांची संख्या वाढल्याने यंदाची निवडणूक चुरशीची होणार, हे निश्‍चित होते. प्रचाराच्या पहिल्याच दिवसापासून डॉ. तांबे व भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील यांनी प्रचाराचा धुरळा उडविला होता. केंद्रात व राज्यात असलेली भाजपची सत्ता ही डॉ. पाटील यांची जमेची बाजू होती. मात्र प्रत्यक्षात भाजपच्या नेत्यांनीही प्रचाराकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. भाजपचे स्थानिक नेते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गुंतल्याने त्याचाही फटका पाटील यांना बसला. याउलट डॉ. तांबे यांना नगर जिल्ह्यातून चांगले पाठबळ होते. माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे डॉ. तांबे मेव्हणे असल्याने त्यांनी जिल्ह्यात मतदारांची चांगली बांधणी केली होती. कॉंग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व थोरात यांच्यात वाद झाले असले, तरी ते नंतर निवळले. वैयक्तिक डॉ. तांबे व विखे यांचे संबंध वैयक्तिकरीत्या चांगले असल्याने विखेंचीही त्यांना मदत झाली. त्यामुळे तांबे यांची विजयाची घोडदौड चालूच राहिली. महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांचा युवकांमधला जनसंपर्कही चांगला आहे. त्याचाही फायदा डॉ. तांबे यांना होऊ शकला. सत्यजित यांनी वडिलांच्या विजयासाठी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. याशिवाय पत्नी दुर्गा तांबे या संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आहेत. त्याचाही फायदा डॉ. तांबे यांना झाला. 

नगर, नाशिक, धुळे, जळगाव व नंदूरबार या पाच जिल्ह्यांतील 54 तालुके असा विस्तीर्ण मतदार संघ असूनही सातत्याने संपर्क वाढविण्याचे कसब डॉ. तांबे यांना कामी आले. गेल्या सात वर्षांत डॉ. तांबे यांनी उत्तर महाराष्ट्रात चांगला संपर्क ठेवला. अधिकाधिक पदवीधरांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेतल्याने युवकांच्या या फळीची मोठी मदत त्यांना झाली. मतदारनोंदणी करून घेण्यासाठी ते कायम प्रयत्नशील राहिले. लोकांच्या व्यापक सहभागातून उत्तम काम करण्याचा परिपाठ ठेवल्याने त्यांना फायदा झाला. वैद्यकीय क्षेत्रात डॉक्‍टरांवर होणारे हल्ले रोखणारा वैद्यकीय संरक्षण कायदा मंजूर करून घेण्यासाठी डॉ. तांबे यांनी पुढाकार घेतला. साहजिकच वैद्यकीय क्षेत्राची सहानुभूती मिळाली. 
एक नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या शिक्षणसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याविषयीचा, तसेच विनाअनुदान काळातील सेवा ग्राह्य धरण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यासाठी डॉ. तांबे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. शिक्षणसेवकांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्याची आग्रही मागणी 2009 पासून त्यांनी सातत्याने केली. तत्कालीन आघाडी सरकारने ती मान्य करून त्यात वाढही केली. कनिष्ठ महाविद्यालयांतील प्राध्यापकांचा 1996 पासूनचा पाचव्या वेतन आयोगाचा फरक मिळवून देण्याचा अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांची धडपड शिक्षण क्षेत्राच्या आजही स्मरणात आहे. 

अपंग शाळांचे संघटन तयार करून राज्यस्तरीय संघटनेची निर्मिती करण्यात डॉ. तांबे यांचा पुढाकार होता. त्याचाच भाग म्हणून शिर्डी येथे राज्य अधिवेशन आयोजित केले. नॉन क्रिमीलेअरची मर्यादा सहा लाखांपर्यंत वाढविण्याविषयी सतत विधिमंडळात प्रश्‍न उपस्थित केले. माध्यमिक शाळांना शंभर टक्के अनुदान मिळाले पाहिजे, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. नाशिक-नगरचे हक्काचे पाणी पळवून ते मराठवाड्याला देण्यासंदर्भातील अन्यायी पाणीवाटपाला डॉ. तांबे यांनी कायम विरोध केला. त्यामुळे डॉ. तांबे शेतकऱ्यांच्या स्मरणात राहिले. नगरच्या औद्योगिक प्रश्‍नात डॉ. तांबे यांनी मध्यस्थी करून उद्योजकांची सहानुभूती मिळविली. उद्योजकांच्या विविध अडचणींसंदर्भात मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, उद्योग सचिवांशी सुसंवाद घडवून आणला. या सर्व गोष्टी त्यांना विजयापर्यंत घेऊन गेल्या. 

  • एकूण मतदान : एक लाख 43 हजार 876 
  • बाद झालेली मत : 14 हजार 810 
  • मोजलेले मतदान : एक लाख 28 हजार 406 
  • मिळालेली मते : 
  • डॉ. सुधीर तांबे : 83 हजार 311 
  • डॉ. प्रशांत पाटील : 40 हजार 486 
  • प्रकाश देसले : 1821 
  • डॉ. तांबे यांची 42 हजार 825 मतांनी आघाडी 

पश्चिम महाराष्ट्र

स्टुडंट युनियनची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने कोल्हापूर : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्ज सरसकट माफ व्हावे, केजी टू पीजी...

05.03 AM

सोलापूर : आपल्यांना मनातलं काही तरी सांगायचं, पण नातं तुटण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत नाव न सांगता एखादी गोष्ट सांगायला मिळाली...

04.03 AM

विद्यापीठात राज्य महिला आयोगाची कार्यशाळा कोल्हापूर: भारतीय राज्यघटनेने स्त्री-पुरुष समानतेचे तत्त्व स्वीकारले असले तरी...

03.33 AM