पुजारी अशोक भणगे अखेर निलंबित

पुजारी अशोक भणगे अखेर निलंबित

मंदिर समितीचा निर्णय; शिस्तभंगाची कारवाई, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
पंढरपूर - येथील श्री विठ्ठल मंदिरात श्री विठ्ठलाच्या मूर्तीस घालण्यासाठी फुलांचा हार मूर्तीच्या दिशेने टाकल्याने चिडलेल्या मंदिर समितीचा कर्मचारी असलेल्या पुजाऱ्याने एका भाविकास मारहाण केली होती. या प्रकरणातील पुजारी म्हणून नियुक्तीस असलेल्या अशोक भणगे याला अखेर मंदिर समितीने निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.
श्री विठ्ठल- रुक्‍मिणीच्या मूर्तीचे संरक्षण व्हावे यासाठी देवाच्या मूर्तीवर हळद, कुंकू, बुक्का, फुले व हार टाकू नये, अशी मंदिर समितीची अपेक्षा आहे. त्या संदर्भात स्पीकरद्वारे सूचना सांगितल्या जात असतात; परंतु बहुतांश भाविक सोबत आणलेला हार देवाच्या मूर्तीला घालण्यासाठी मूर्तीच्या दिशेने टाकतात. त्या वेळी मूर्तीच्या शेजारी पुजारी म्हणून नियुक्त केलेले मंदिर समितीचे कर्मचारी मूर्तीवर हार पडू नये व देवाच्या मूर्तीला तसेच मूर्तीवरील दागिन्यांना इजा होऊ नये यासाठी हार मूर्तीच्या दिशेने जाऊ न देता मध्येच अडवतात.

येथील श्री विठ्ठल मंदिरात बुधवारी (ता. 17) सकाळी साडेसहाच्या सुमारास दत्तात्रेय सुसे (रा. शेवगाव, ता. नगर) हे त्यांच्या कुटुंबीयांसह दर्शनासाठी आले होते. सुसे यांनी सोबत आणलेला हार श्री विठ्ठलाच्या गळ्यात घालण्यासाठी मूर्तीच्या दिशेने फेकला. तो हार मूर्तीवरील मुकुटाच्या मागे जाऊन अडकला. त्या वेळी मूर्तीशेजारी पुजारी म्हणून उभे असलेले मंदिर समितीचे कर्मचारी अशोक भणगे यांनी चिडून सुसे यांना मारहाण केली होती. त्यानंतर सुसे यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात पुजारी भणगे यांच्याविरोधात तक्रार केली होती.

मूर्तीच्या संरक्षणासाठी जबाबदार पुजारी म्हणून नियुक्त केलेले कर्मचारी असले तरी या घटनेनंतर कर्मचारी भणगे यांनी सुरक्षारक्षक अथवा मंदिर समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सुसे यांच्याविरोधात तक्रार न करता थेट त्यांना मारहाण केल्यामुळे भाविकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाईल, असे समितीने सांगितले होते.

दरम्यान, प्राथमिक चौकशी व सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर कर्मचारी भणगे यास निलंबित केले असून, त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचे समितीचे व्यवस्थापक विलास महाजन यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com