डाळीची यंदा स्वस्ताई

डाळीची यंदा स्वस्ताई

कोल्हापूर - यावर्षी मराठवाडा, विदर्भात चांगला पाऊस झाल्याने कडधान्याचे पीक वाढले आहे. मात्र उत्पादक शेतकऱ्याची चिंता काही कमी झालेली नाही. नोटाबंदी झाल्यापासून बाजारातील रोखीच्या व्यवहाराची गती मंदावली आहे. गरजेइतपत खरेदीचे सूत्र व्यापारीवर्गाने अवलंबले आहे. त्यामुळे कडधान्यांच्या घाऊक बाजारात आवक असूनही उठाव होत नसल्याने भाव कोसळले आहेत. गतवर्षी सुमारे दोनशे रुपयांवर पोचलेल्या डाळींचे भाव यंदा मात्र शंभरीचा आतच आहेत.   

महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळामुळे डाळीचे पुरेसे उत्पादन निघाले नाही. त्यामुळे बाजारात गेली दोन वर्षे डाळींचा तुटवडा निर्माण झाला होता. काही ठिकाणी व्यापारी वर्गाकडून याचा फायदा घेत साठेबाजीचा प्रकार झाला. त्यामुळे तूर डाळीचे भाव दोनशे रुपयांपर्यंत गेले. इतर डाळींचे दर दीडशेंच्या वर गेल्याने सर्वसामान्यांच्या जेवणातील डाळ गायब झाली होती. दर नियंत्रणात आणण्यासाठी विदेशातून तूर डाळ आयात करावी लागली होती. यावर्षी मात्र अगदी उलट चित्र आहे. डाळींचे भाव शंभरीच्या आत असल्याने उत्पादकाचे कंबरडे मोडले आहे. 

नोटाबंदीनंतर बॅंकेतील खात्यावर पैसे कोठून आणले इथपासून ते नियमित उलाढालीवर कर वसुली धडाक्‍यात सुरू झाली आहे. त्यामुळे कडधान्य खरेदी करून घाऊक पातळीवर होणारे व्यवहार थंडावले आहेत. काही व्यापारी बाजारात कडधान्य डाळींची आवक वाढली की, कमीत कमी किमतीत खरेदी करून तोच माल वर्षभर चढ्या भावात विक्री करतात. यामध्ये डाळ बनविणाऱ्या काही कंपन्यांचा सहभाग  होता. या वेळी साठेबाजीला लगाम बसला आहे. आता आलेल्या मालाच्या नोंदी ठेवणे व त्यानुसार कर भरावा लागत असल्याने अतिरिक्त साठ्याचे प्रकार थंडावले आहेत.

उदगीर, लातूर, बार्शी, बीड, अकोला येथील बाजारपेठेत सध्या मोठ्या प्रमाणात कडधान्य येत आहे. मात्र अनेक व्यापारी गरजेएवढाच माल खरेदी करीत असल्याने जागेवर मालाचा उठाव नाही. परिणामी भाव उतरत आहेत. येत्या दोन महिन्यांत नवीन डाळींचा साठा वाढणार आहे. डाळीचा उठाव नाही झाला, भाव आणखी खाली आल्यास शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. 

डाळींचे प्रतिक्विंटल भाव (कंसातील प्रतिकिलोनुसार) 
 तूर डाळ अनपॉलिश    ६००० ते ७००० (८४ ते ८८ रु.)
 मूग डाळ पॉलिश    ६२०० ते ६६०० (७० ते ७२ रु.)
 वाटाणा हिरवा     ३२०० ते ३६००(३८ ते ४० रु.)
 पांढरा     ४००० ते ४२००  (४४ ते ४७ रु.)
 हरभरा     ७४०० ते ८००० (८६ ते ८८ रु.)
 बेळगावी मसूर     १९००० ते १९५०० (२०० ते २२० रु.)
 देशी मसूर     ७५०० ते ७८०० (८४ ते ८८ रु.)
 मूग हिरवा     ५५०० ते ५८०० (५८ ते ६० रु.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com