माजनाळला 34 वर्षांची एक गाव एक गणपती परंपरा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

विधायकतेतून समृद्ध गाव : डॉल्बीलाही दिला फाटा

विधायकतेतून समृद्ध गाव : डॉल्बीलाही दिला फाटा
पुनाळ - समृद्ध गावासाठी जे काही हवे, ते पन्हाळा तालुक्‍यातील माजनाळ गावाने सिद्ध केले आहे. गावाने सलग 34 वर्षे एक गाव एक गणपती परंपरा जोपासली आहे. ज्येष्ठ लोकांच्या संकल्पनेतून गावसभेच्या ठरावानुसार गावात एकमत झाले. त्यातून गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना रुजली. आज तरुण वर्गाच्या पुढाकारातून या संकल्पनेला विधायक स्वरूप दिले आहे. गावातील विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरासमोर हा सार्वजनिक गणपती बसवला जातो.

गावात एकच गणपती असल्याने सकाळ-संध्याकाळ सामुदायिक आरतीसाठी तीन पिढ्या एकत्र येतात. गणपती मूर्तीसाठी कोणत्याही स्वरूपात वर्गणी गोळा केली जात नाही. ग्रामस्थांच्या दातृत्वातून दरवर्षी मूर्ती दिली जाते. मूर्ती देणाऱ्यांची संख्या पाहता पुढील पाच ते सात वर्षे मूर्ती देणाऱ्यांनी नंबर लावला आहे. या विधायक कामासाठी सर्वजण स्वयंस्फूर्तीने राबतात, मात्र एकोपाच्या जोरावर समाजकारण असो की राजकारण अगदी गुण्यागोविंदाने नांदत आहेत. गावाने विविध पुरस्कार मिळवले आहेत. याच एकोप्याने पोलिसपाटील, पोलिस यांच्यावरील ताण कमी झाला आहे. शिल्लक रकमेतून गावात होणाऱ्या विधायक कार्याला मदत केली जाते. गणपती विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीला फाटा देत गावाने यातही वेगळी वाट चोखाळली आहे.