पुणतांब्याच्या शेतकऱ्यांचा एक जूनपासूनचा संप स्थगित 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

पुणतांबे - शेतकऱ्यांच्या मागण्यांचा दोन महिन्यांत सकारात्मक विचार करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्याने पुणतांबे व परिसरातील शेतकऱ्यांनी पुकारलेला एक जूनपासूनचा संप स्थगित करण्यात आला. याबाबतची घोषणा मुंबईत करण्यात आली. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. धनंजय धनवटे यांनी ही माहिती दिली. 

शेतकऱ्यांना कर्जमाफीसह विविध प्रश्‍नांबाबत शेतकऱ्यांच्या संपाची कल्पना सर्वप्रथम पुणतांबे येथूनच पुढे आली. ग्रामसभेत ठराव करून एक जूनपासून शेतकरी संपाची घोषणा झाली होती. त्यानंतर राज्यभरातील शेतकरी संपाच्या या आंदोलनात पुढे आले. राज्यात सुमारे अडीच हजार ठराव झाले. त्यात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, शेतीमालाला हमीभाव द्यावा, दुधाला पन्नास रुपये लिटर भाव मिळावा, शेतमालाला योग्य भाव मिळावा, स्वामिनाथन आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करावी आदी मागण्या करण्यात आल्या होत्या. 

मुंबईतून दूरध्वनीवरून बोलताना डॉ. धनवटे यांनी सांगितले, की शेतकऱ्यांच्या या संपाची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आम्हाला चर्चेसाठी बोलाविले. आज मंत्रालयात तासभर चर्चा झाली. शेतकऱ्यांचे प्रश्न दोन महिन्यांत निकाली काढू, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, अभ्यासगटाची स्थापना करून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले जातील, अशी आश्‍वासने मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे शेतकरी शिष्टमंडळाने एक जूनपासूनचा संप स्थगित केल्याचे मुंबईत जाहीर केले. शिष्टमंडळात विजय धनवटे, सुभाष वहाडणे, शिर्डीचे पंकज लोढा, विजय कोते, दिलीप मुठे, बाळासाहेब चव्हाण, नानासाहेब काळवाघे आदींचा समावेश होता. 

संप होणारच - जाधव 
दरम्यान, संप स्थगित केल्याची बातमी समजताच, "एक जूनपासून शेतकऱ्यांचा संप होणारच,' असे किसान क्रांती राज्य कृतिसमितीचे सदस्य धनंजय जाधव यांनी "सकाळ'ला दूरध्वनीवरून सांगितले.

Web Title: Punatambi farmers suspended from June 1