आधार नोंदणीतच भरपूर चुका 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

चुकी सरकारची; परिणाम मात्र जनतेला भोगावे लागत आहे. ज्या कंपनीला आधार नोंदणीचे काम दिले होते. त्यांच्याकडूनच या चुका झाल्या आहेत. त्यामुळे सरकारने त्यांना बिल आदा करू नये. तसेच कार्डातील चुकांच्या दुरुस्तीसाठी तातडीने केंद्रांची संख्या वाढवावी. 
- विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच 

पुणे - केंद्र व राज्य सरकारने आधार कार्ड बंधनकारक केल्यानंतर आधार नोंदणी करतानाच तपशिलात मोठ्या प्रमाणावर चुका झाल्याचे समोर आले आहे. जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या शिबिरात दुरुस्तीसाठी झालेल्या गर्दीवरून हेच स्पष्ट झाले आहे. 

आधार नोंदणीसाठी नेमलेल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या चुकांमुळे हा सर्व प्रकार घडला असून, संबंधित कंपनीवर कारवाई करावी आणि आधार कार्डातील चुकांची दुरुस्ती करण्यासाठीच्या केंद्रांची संख्या वाढावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. 

राज्य सरकारकडून आधार कार्ड नोंदणी करण्यासाठी यापूर्वी खासगी कंपन्यांची नियुक्ती केली होती. या कंपनीचे कर्मचारी पुरेसे शिक्षित नव्हते. त्यामुळे नोंदणी करताना नाव, पत्ता, लिंग, जन्मतारीख यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चुका झाल्या आहेत. आता केंद्र आणि राज्य सरकारने विविध योजनांसाठी हा कार्ड क्रमांक बंधनकारक केला असून, कार्डातील चुकांमुळे आधार जोडणीत नागरिकांना अडचणी येत आहेत. 

दरम्यान, सरकारने ज्या कंपनीला हे काम दिले होते. त्या कंपनीबरोबरचा करारनामा संपल्यामुळे सरकारने ते काम कंपनीकडून काढून घेतले. तसेच या पुढे सरकारी कार्यालयांमध्येच आधार नोंदणीचे काम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, अद्याप शहरात सर्व सरकारी कार्यालयांमध्ये दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही. ज्या ठिकाणी सुरू आहे, तेथे दिवसभरात जास्तीत जास्त वीस ते तीस कार्डांतील दुरुस्ती होते. काही ठिकाणी कनेक्‍टिव्हिटीला अडचण येत आहे. परिणामी दुरुस्ती केंद्र अपुरी असल्याचा फटका नागरिकांना बसत आहे. 

Web Title: pune news aadhar card