किसान क्रांतीचे सदस्य चर्चेसाठी मुंबईत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

मागण्या मान्य न झाल्यास सोमवारी "महाराष्ट्र बंद'; कोअर कमिटीचा निर्णय

मागण्या मान्य न झाल्यास सोमवारी "महाराष्ट्र बंद'; कोअर कमिटीचा निर्णय
पुणतांबे - शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी किसान क्रांतीचे सदस्य आज मुंबईला रवाना झाले. चर्चा यशस्वी न झाल्यास सोमवारी (ता. पाच) "महाराष्ट्र बंद' ठेवण्याचा निर्णय त्यापूर्वी कोअर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आल्याचे जयाजीराव सूर्यवंशी यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी किसान क्रांतीच्या नेत्यांसह सुमारे 15 सदस्य संध्याकाळी चार वाजता मुंबईकडे रवाना झाले. मंत्रालयात रात्री उशिरा बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या संपाचे केंद्र असलेल्या पुणतांब्यात आज किसान क्रांतीच्या "कोअर कमिटी'च्या सदस्यांची बैठक झाली. त्यानंतर सूर्यवंशी, धनंजय जाधव पत्रकारांशी बोलले ते म्हणाले, 'अण्णा हजारे यांनी मध्यस्थीची आणि चर्चेची तयारी दाखविली आहे. तूरखरेदी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयांवर ते कधीच बोलले नाहीत. आम्हाला कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही. शेतकरी योग्य तो निर्णय घेतील.''
""मंत्रालयातून आम्हाला चर्चेचे निमंत्रण आले आहे. रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा होईल. चर्चेनेच प्रश्‍न सुटतो याची आम्हाला कल्पना आहे. त्यामुळेच आम्ही चर्चा करणार आहोत. त्यातून सकारात्मक निर्णय न झाल्यास पाच जूनला "महाराष्ट्र बंद' आणि सहा जूनला सर्व सरकारी कार्यालयांना कुलूप लावू. कोणत्याच मंत्र्याला सात जूनला रस्त्यावर फिरू दिले जाणार नाही,'' असेही जाधव व सूर्यवंशी म्हणाले.

बैठकीस संदीप गिड्डे, शंकर दरेकर, अनिल धनवट, सुहास वहाडणे, सीमा नरोडे, किरण सुराळकर, विजय काकडे, योगेश रायते, सचिन कानवडे आदी उपस्थित होते. संपाच्या दुसऱ्या दिवशीही गावात भाजीपाला, दूध यांची विक्री झाली नाही. त्यामुळे सर्वांचेच हाल झाले.