मुख्यमंत्र्यांचे आमंत्रण शेतकऱ्यांनी धुडकावले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

संपाबाबत चर्चेसाठी पुणतांब्यातच येण्याची मागणी
पुणतांबे - संपाबाबत चर्चेसाठी मुंबईला येण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आमंत्रण शेतकऱ्यांनी आज धुडकावले. चर्चा करायचीच असेल, तर मुख्यमंत्र्यांनी पुणतांब्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

संपाबाबत चर्चेसाठी पुणतांब्यातच येण्याची मागणी
पुणतांबे - संपाबाबत चर्चेसाठी मुंबईला येण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आमंत्रण शेतकऱ्यांनी आज धुडकावले. चर्चा करायचीच असेल, तर मुख्यमंत्र्यांनी पुणतांब्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या एक जूनपासून सुरू होणाऱ्या संपाआधी येथे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. हे आंदोलन सुरू होऊन चार दिवस झाले, तरी सरकारचे कोणीही प्रतिनिधी भेटण्यासाठी आले नाहीत, याचा राग शेतकऱ्यांनी व्यक्त केला होता. दरम्यान, राहात्याचे तहसीलदार माणिक आहेर, नायब तहसीलदार राहुल कोताडे, मंडल अधिकारी नागवडे, तलाठी गणेश वाघ यांनी आज आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांची भेट घेतली.

आहेर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा निरोप शेतकऱ्यांना सांगितला. मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी उद्या (मंगळवारी) दुपारी संपकरी शेतकऱ्यांना मुंबईला बोलावले आहे, असे ते म्हणाले. मात्र, हे आमंत्रण शेतकऱ्यांनी स्वीकारले नाही. किसान क्रांती समन्वयक धनंजय जाधव, संदीप गिड्डे, बी. जी. पाटील, सुहास वहाडणे, धनंजय धोर्डे, माजी सरपंच सर्जेराव जाधव आदींनी अन्य शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यात मुंबईला जायचे नाही, असे ठरले. चर्चा करायचीच असेल, तर मुख्यमंत्र्यांनी येथे यावे, असे सांगितले.

दरम्यान, धरणे आंदोलनाला आजही मोठा पाठिंबा मिळाला. आंदोलनस्थळी गर्दी होती. माजी मंत्री बबनराव घोलप यांनीही येथे येऊन पाठिंबा दिला. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, ही शिवसेनेची भूमिका आहे, असे त्यांनी सांगितले. कोपरगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे, प्रमोद लबडे, बापूसाहेब आढाव, छावा क्रांतिसेनेचे संपर्कप्रमुख विश्‍वनाथ वाघ आदींनी आज संपाला पाठिंबा दिला.