न्याय मिळविण्यासाठी शेतकऱ्यांचे संघटन आवश्‍यक - बाबा आढाव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

पुणतांबे - शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी नेते मोर्चे काढत आहेत; परंतु शेतकऱ्यांचे संघटन केल्याशिवाय न्याय मिळणार नाही, असे राज्य माथाडी हमाल कामगार संघटनेचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी शुक्रवारी सांगितले.

पुणतांबे - शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी नेते मोर्चे काढत आहेत; परंतु शेतकऱ्यांचे संघटन केल्याशिवाय न्याय मिळणार नाही, असे राज्य माथाडी हमाल कामगार संघटनेचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी शुक्रवारी सांगितले.

शेतकरी संपाची पूर्वतयारी म्हणून दोन दिवसांपासून येथे सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यात बाबा आढाव, शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, शेतकरी संघटना मराठवाडा संघटक जयाजीराव सूर्यवंशी, कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आज आंदोलनात भाग घेऊन संपाला पाठिंबा दिला. संप यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करताना आढाव बोलत होते.

पुणतांबेकरांनी मांडलेली संपाची भूमिका चांगली आहे, असे सांगून आढाव म्हणाले, 'शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा पाया आहे, तरीही पंतप्रधान त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष न देता ग्राहकांच्या हिताचा विचार करत आहेत. सरकारने शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करावा व शेतीमालाला हमीभाव द्यावा. तोपर्यंत शेतकऱ्यांचा संप सुरू राहील आणि त्याला हमाल माथाडी कामगारांचा पाठिंबा राहील.''

खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले, 'शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी, ही शिवसेनेची भूमिका आहे. या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी संपाला पाठिंबा देत आहे.''

आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करताना विजय वहाडणे म्हणाले, 'सत्ताधारी विरोधात असताना कर्जमुक्ती मागत होते. आताचे विरोधक या प्रश्नावर संघर्ष यात्रा काढत आहेत. मतांच्या राजकारणासाठी नेते शेतकऱ्यांना झुलवत ठेवतात. "निळवंडे'च्या पाण्यासाठी चाळीस वर्षांपासून लढा सुरू आहे. शिर्डीसाठी बंद पाइपमधून पाणी येणार आहे. ते पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनाही मिळावे, अशी मागणी करणार आहे.''