पिव्वर दुधाचा ‘लेटेस्ट’ चहा लय भारी...

कोल्हापूर - मंगळवार पेठेतील लेटेस्ट तरुण मंडळाच्या चौकातील साईराज टी स्टॉलवर चहा करताना  नेताजी भोकरे.
कोल्हापूर - मंगळवार पेठेतील लेटेस्ट तरुण मंडळाच्या चौकातील साईराज टी स्टॉलवर चहा करताना नेताजी भोकरे.

कोल्हापूर - चहाची तल्लफ भागवण्यासाठी मंगळवार पेठेतील लेटेस्ट तरुण मंडळाच्या चौकात गर्दी नेहमीच असते. ‘बासुंदी’ चहा नावाने येथे चहा मिळतो, असाच अनेकांचा समज आहे, पण हा चहा मिळतो केवळ ‘पिव्वर’ दुधाचा. हासूर बुद्रुक (ता. कागल) येथील नेताजी दिनकर भोकरे यांची ही चहा टपरी इतकी फेमस आहे, की थेट ग्रामीण भागातील लोक चहाची चव घेतल्याखेरीज राहत नाहीत. काही जण घरी चहा घेणार नाहीत, पण येथे हमखास चहा पिणार, असेच समीकरण तयार झाले आहे. 

भोकरे यांच्या शिक्षणाची गाडी पाचवीपर्यंत धावली. बेताच्या परिस्थितीमुळे शिक्षणाला ब्रेक लागला. आई, वडील, दोन बहिणी, दोन भाऊ असे यांचे कुटुंब. मामाकडून शेती मिळाली, तरी त्यातून मिळणारे उत्पन्न तुटपुंजे होते. भोकरे यांनी पाचवीनंतर राजारामपुरी आठव्या गल्लीतील चहा टपरीवर कामाला सुरवात केली. महिन्याकाठी नऊ रुपये वेतन सुरू झाले. पहाटे चार ते रात्री नऊपर्यंत काबाडकष्टाचा अध्याय सुरू होता. 

या कामातील अनुभव त्यांना उपयोगी ठरला. त्यांनी १९९२ ला लेटेस्ट चौकात डॉ. ताम्हणकर, भाऊ संभाजी भोकरे व लेटेस्टचे अध्यक्ष गजानन यादव यांच्या सहकाऱ्यामुळे चहा टपरी सुरू केली. गुलाब गल्लीत भाड्याच्या घरात राहण्याची व्यवस्था झाली. पहाटे चार ते सायंकाळी साडेसातपर्यंत चहा विक्री सुरू झाली. 

भोकरे यांच्या भाषेत चहा ‘पिव्वर’ पाहिजे, असा आग्रह होता. त्यांनी पिव्वर दुधाचा चहा केला, तर तो प्यायला लोक खूप येतील, असा अंदाज बांधला. तो खरा ठरला. त्यांच्या ‘साईराज’ चहा टपरीवर गर्दी वाढली. हाती चार पैसे येऊ लागल्यानंतर पाचगावमध्ये घर बांधले. काही वर्षांपूर्वी टू व्हीलर घेतली. आता टपरीवर दोन कामगार आहेत. फुल्ल चहा बारा, तर हाफ दहा रुपयाला आहे. त्यांचा मुलगा साईराज दहावी व धनराज सहावीत शिकतो आहे. दोघे महाराष्ट्र हायस्कूलमध्ये आहेत. साईराजने बॉक्‍सिंगमध्ये पदके मिळवली आहेत.

धंदा कोणीही करते. पण, त्यात नाव झाले पाहिजे. त्यामुळेच आम्ही पिव्वर दुधाचा चहा विकतो. अनेकांना तो बासुंदी चहा वाटतो. आम्हाला आमची क्वालिटी महत्त्वाची वाटते. 
- नेताजी भोकरे, मालक, साईराज टी स्टॉल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com