अभयारण्यातील जमिनींची बेकायदा विक्री 

अभयारण्यातील जमिनींची बेकायदा विक्री 

कोल्हापूर - राधानगरी अभयारण्य क्षेत्रांत बांधलेल्या एका हॉटेलचा (रिसॉर्ट) वन्यजीव विभागाला "छडा' लागला. संबंधितांवर गुन्हा दाखल झाला; पण या निमित्ताने अभयारण्यात एक नव्हे, दोन नव्हे तर जमीन खरेदी-विक्रीचे तब्बल 1400 व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अभयारण्य घोषित करण्याची प्रक्रिया होताना त्या विशिष्ट क्षेत्राच्या हद्दीत जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार, गहाणवट किंवा नवे बांधकाम करायचे नाही, असे बंधन आहे; पण ते कागदावरच आणि वर्दळ मात्र अभयारण्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

वन्यजीव विभागाने या व्यवहारांचे दस्त एकत्रित करण्यास सुरवात केली असून खरेदी देणारे व घेणाऱ्यांना नोटिसा पाठवल्या जाणार आहेत. या शिवाय खरेदी-विक्रीस मनाई असलेल्या क्षेत्रांतील जमिनींचे व्यवहार नोंद कसे झाले? येथपासून ते हे होत असताना वन्यजीव विभागाचे तत्कालीन अधिकारी काय करत होते? याचीही चौकशी होणार आहे. खरेदी-विक्रीच्या 1400 व्यवहारांत पाच गुंठ्यांपासून ते पाच-सहा एकर जमिनींचा समावेश आहे. एका रिसॉर्टचे मोठे बांधकाम आहे, तर इतर काही बांधकामे लहान स्वरूपाची आहेत. 

अभयारण्य घोषित करताना त्या क्षेत्रातील गावांचे पुनर्वसन केले जाते. वन्यप्राण्यांना उपद्रव होऊ नये या बरोबरच त्या क्षेत्रातील शेतकऱ्यांचेही नुकसान होऊ नये म्हणून घर शेतीसाठी पर्यायी जागा किंवा एकरकमी नुकसान भरपाई दिली जाते. त्याचवेळी या घोषित क्षेत्रातील जमिनींचे खरेदी-विक्री व्यवहार बेकायदेशीर ठरवले जातात. बांधकाम चालू असल्यास वन्यजीव विभाग अधिकारी हरकत घेऊ शकतात; पण या पैकी कोणतीही खबरदारी घेतली नाही. जंगल परिसरात जागा मिळते म्हणून अनेकांनी जागा घेतल्या. काहींनी पुनर्वसनाऐवजी जमिनी विकलेल्या बऱ्या म्हणून जमिनी विकल्या, असे एकाने केले म्हणून दुसऱ्याने केले. वन विभागाचे याकडे लक्ष जात नाही म्हणून तिसऱ्याने केले आणि जवळजवळ 1400 व्यवहार झाले. 

ज्या क्षेत्रात हे व्यवहार झाले तो अतिशय दाट जंगलाचा भाग आहे. वन्यप्राण्यांचे तेथे अस्तित्व आहे. किंबहुना व्याघ्र प्रकल्पातील हा महत्त्वाचा कॉरिडॉर आहे. त्यामुळेच हा परिसर निर्मनुष्य करण्यासाठी गावाचेच पुनर्वसन करण्यात येत असताना जमिनीचे लहान-मोठ्या तुकड्यांत खरेदी विक्रीचे व्यवहार होत असल्याचे स्पष्ट झाले. 

12 तील बांधकाम 16 ला उघड 

अभयारण्य क्षेत्रातील एका रिसॉर्टचे बांधकाम तर 2012 पासून सुरू होते. 2016 मध्ये ते लक्षात आले. जंगलातल्या झाडीत ते लांबून दिसत होते. पण जुने एखादे मंदिर असावे म्हणून त्याकडे लक्ष दिले गेले नव्हते. प्रत्यक्षात तेथे रिसॉर्टचा फलक लागल्यावर वनखाते खडबडून जागे झाले. 

चला पार्टीला... 

अभयारण्य हा पर्यावरण, वन्यजीवांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा भाग. पण दाजीपूर, राधानगरी अभयारण्याचे गांभीर्य अनेकांना कळालेले नाही. वास्तविक अभयारण्यात शेती सोडाच; पण विनापरवाना पाऊलही टाकता येत नाही, राहता येत नाही. मात्र, राधानगरी, दाजीपूरचा परिसर पाहिला तर "पार्टी करायची आहे तर चला दाजीपूरला' हा समज रुढ झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com