कांद्याला योग्य भावासाठी राहुरीत 'लिलाव बंद'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

राहुरी - कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरू होताच योग्य भाव मिळत नसल्याची तक्रार करत शेतकऱ्यांनी आज लिलाव पाच तास बंद पाडले. "रास्ता रोको' आंदोलनही केले. चर्चेनंतर लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय झाला; परंतु दुपारी सव्वातीनच्या सुमारास लिलाव पुन्हा सुरू झाले.

त्यात कांद्याचा भाव सरासरी तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत गेले होते. बाजार समितीत आज कांद्याच्या पन्नास हजार गोण्यांची आवक झाली. सकाळी सव्वादहा वाजता कांद्याचे लिलाव सुरू झाले. त्या वेळी दोन हजार ते दोन हजार 700 रुपये क्विंटल भाव निघाले. त्याला शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला. राहाता बाजार समितीत याच कांद्याला साडेतीन हजारांच्या आसपास भाव मिळत असताना राहुरीत सातशे-आठशे रुपयांनी कमी भाव का? असा प्रश्‍न करत शेतकऱ्यांनी नगर-मनमाड मार्गावर "रास्ता रोको' आंदोलन सुरू केले. सभापती अरुण तनपुरे, उपसभापती दत्तात्रेय खुळे, बाळासाहेब खुळे, सुरेश बाफना, शरद पेरणे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवी मोरे व संजय पोटे यांच्या बैठकीत निर्णय न झाल्याने आंदोलक शेतकरी पुन्हा "रास्ता रोको'साठी जाऊ लागले; मात्र पोलिस निरीक्षक वाघ यांनी त्यांना परावृत्त केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रवेशद्वाराजवळ ठिय्या दिला. बराच वेळ हे आंदोलन सुरू होते. दुपारी सव्वातीनच्या सुमारास मार्ग निघाला आणि लिलाव सुरू झाले.