सांगली जिल्ह्यात पावसाने ठोकला तळ

सांगली जिल्ह्यात पावसाने ठोकला तळ

सांगली - गेल्या दीड महिन्यापासून चकवा देणाऱ्या पावसाने दोन दिवसांपासून तळ ठोकल्याने आता शेतकऱ्यांच्या आनंदाला उधाण आले आहे. काल रात्रीपासून हलका-मध्यम पाऊस सुरू झाला आणि दिवसभर रिपरिप सुरू राहिली. पावसाचे थोडे उशिरा आगमन झाले असले तरी यावर खरीप साधला जाईल, असा विश्‍वास शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे उरल्यासुरल्या पेरण्या उरकण्याची लगबग सुरू झाली आहे.

दरम्यान, कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात सातत्याने चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. चांदोली धरणातून कालपासून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कोयना धरण आणखी किमान १० टीएमसीने म्हणजे ८० टीएमसी इतके भरल्यानंतर त्यातून विसर्ग  सुरू केला जाण्याची शक्‍यता पाटबंधारे विभागाने व्यक्त केली आहे. 

शिराळ्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांतून पाणीच पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे ३५ टीएमसी क्षमतेचे चांदोली धरण भरले असून त्यातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे वारणा नदी दुथडी भरून वाहू लागली  आहे. वाळवा, पलूस तालुक्‍यातही चांगला पाऊस झाला आहे. दुष्काळी कवठेमहांकाळ तालुक्‍यात पावसाने हजेरी लावली आहे. जतमध्ये हलका पाऊस होतोय. मिरज तालुक्‍यात आज दिवसभर दमदार पावसाने हजेरी लावली आहे. सकाळपासून सरींवर सरी येताहेत.

झरेत आठवडा बाजारकरांची तारांबळ   
झरे - झरे (ता. आटपाडी) येथे आज सूर्य उगवल्यापासून सतत रिपरिप सुरू झाल्याने झरेतील बाजारात ग्राहक व व्यापारी यांची तारांबळ उडाली. येथील बाजार दरसोमवारी भरतो. सांगली व सातारा जिल्ह्याच्या सीमेवर झरे गाव असल्याने येथे मोठी उलाढाल होते. पण सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली. त्यामुळे आजचा बाजार संथ गतीने सुरू होता. व्यापारी व ग्राहक तुरळक प्रमाणात होते. चारनंतर पावसाने थोडी उसंत घेतल्यानंतर बाजार सुरळीत सुरू झाला.

खानापूर तालुक्‍यात संततधार
विटा : खानापूर तालुक्‍यात दोन दिवस संततधार पाऊस सुरू आहे. खरीप हंगामातील पिकांना पाऊस उपयुक्त  ठरत असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. पावसाने जमिनीत सर्वत्र ओलावा निर्माण झाला आहे.  दोन दिवस हवेत गारवा निर्माण झाला आहे. पावसाची रिमझिम व संततधार सुरू असली तरी अद्यापही मोठा पाऊस पडला नाही. त्यामुळे तलाव, ओढे कोरडे ठणठणीत आहेत. मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.

वाळव्यात दिवसभर संततधार
नवेखेड - वाळवा तालुक्‍यात आज दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे सखल भागात पाणी साचून राहिले. दिवसभर सूर्याचे दर्शन झाले नाही.  शेतीकामे ठप्प राहिली. कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, छोटे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. खरीप पिकांना हा पाऊस चांगला आहे.

सावधानतेचा इशारा 
चांदोली परिसरात गेल्या २४ तासात  १०७ मिलिमीटर पावसासह एकूण १४३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.  पावसाचे प्रमाण वाढले तर केंव्हाही पुन्हा धरणातून विसर्ग वाढवला जाणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सावधानता बाळगावी, असा इशारा धरण प्रशासनाने दिला आहे.

धरणांची स्थिती 
कोयना धरणक्षेत्रात सायंकाळी पाचपर्यंत ११८  मिलिमीटर पाऊस झाला. महाबळेश्‍वरला १३६ मिलिमीटर पाऊस झाला. कोयना धरणातील पाणीसाठी ७१.९९ टीएमसी असून, धरण ६९ टक्के भरले आहे. चांदोली धरणातील पाणीसाठा २८.५० टीएमसी आहे. धरण ८३ टक्के भरले आहे. ११ हजार ९०० क्‍यूसेकने विसर्ग आहे. अलमट्टी धरणातून ४५ हजार क्‍यूसेकने विसर्ग केला जात आहे. तेथील पाणीसाठा १०० टीएमसी झाला आहे. धरणाची पाणी पातळी ६२०.७५ मिटर झाली असून पाणीसाठा  ८०७.११६ दशलक्ष घनमीटर म्हणजे  २८.५० टीएमसी झाला आहे त्याची टक्केवारी  ८२.८५ इतकी आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com