आता श्रावणसरी तरी  बरसू दे रे मेघराजा!

आता श्रावणसरी तरी बरसू दे रे मेघराजा!

मायणी - पावसाअभावी दुष्काळी पट्ट्यातील ओढे-नाले, तलाव, बांध-बंधारे कोरडे पडलेत. कुठेही पाणीसाठा नाही. अधूनमधून होणाऱ्या भुरभुरीने पिके कशी तरी तरली आहेत. 

ती जोमाने वाढण्यासाठी पावसाची नितांत गरज आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेले चिंताग्रस्त शेतकरी ग्रामदैवतांसह मेघराजाला साकडे घालू लागलेत. श्रावणसरी तरी चांगल्या बरसू दे, पीक-पाणी चांगलं पिकू दे रे बाबा... अशी साद गावागावांतील लोक घालू लागलेत. 

उन्हाळ्यात हमखास पडणाऱ्या वळवाच्या पावसाने यंदा दडी मारली. मात्र, जूनच्या सुरवातीलाच एक- दोन दिवस बरसल्याने शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला. शेतकऱ्यांनी नशिबावर भिस्त ठेवून पेरण्या उरकल्या. धूळवाफेवर केलेली पेर वाया गेली नाही. अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या हलक्‍या सरींनी पिके उगवून आली. मात्र, ऐन बहरातील पिकांना पाण्याची नितांत गरज आहे आणि पावसाने दडी मारली आहे. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील बहुतांशी धरणे भरत आली आहेत. पूर्व भागातील खटाव, माणसह दुष्काळी पट्ट्यातील लोक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. ऐन पावसाळ्यात खटावातील अनफळे, पाचवड येथे टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पावसाअभावी टंचाईचे ढग अधिकच गडद होऊ लागलेत. पाण्याअभावी पिकांचे कोवळे कोंब सुकू लागलेत. मशागत व बी- बियाणांचा खर्च तरी निघेल का, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. केवळ त्या पळणाऱ्या ढगांकडे आशाळभूत नजरेने पाहण्याशिवाय शेतकऱ्यांपुढे अन्य पर्याय उरलेला नाही. अधूमधून येणाऱ्या भुरभूर पावसामुळे पिके अजून तग धरून राहिलीत. आठवडाभरात पाऊस आला तरच लोकांच्या आशा आकांक्षांना धुमारे फुटणार आहेत. त्यासाठीच गावोगावी शेतकरी देवदेवतांना साकडे घालू लागलेत. 

पावसानं यंदा अवघड केलंय. आषाढ कोरडा गेला. पिकं पिवळी पडाय लागलीत. यंदा काय खरं न्हाय.
- शिवाजी चव्हाण, शेतकरी, मायणी  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com