संवेदनशील होऊन पाण्याबाबत जागृती करा  - इंद्रजित देशमुख

संवेदनशील होऊन पाण्याबाबत जागृती करा  -  इंद्रजित देशमुख

कोल्हापूर - पाण्याच्या प्रश्‍नाबाबत आताच जागे होऊन पुढील पिढीबाबत संवेदनशील व्हा, जलजागृती सप्ताहात संवेदनशीलपणे तळातल्या घटकांपर्यंत प्रबोधन करा, पुढची लढाई ही पाण्याची असेल हे समजून घेऊन प्रत्येकाने जिव्हाळ्याने या विषयामध्ये योगदान द्यावे, असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी केले. 16 ते 22 मार्च या कालावधीत जलसंपदा विभागातर्फे जलजागृती सप्ताह आयोजित केला आहे. यामध्ये ते बोलत होते. 

या वेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, अधीक्षक अभियंता एस. डी. साळुंखे, यांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता जिवणे, कार्यकारी अभियंता विजय पाटील, प्रा. नेताजी पाटील, पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड, तसेच कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी प्रमुख म्हणून उपस्थित होते. 

श्री. देशमुख म्हणाले, ""जागतिक स्तरावर होत असलेल्या तापमानवाढीमुळे जगणे मुश्‍किल होत आहे. पुढील पिढीचा विचार करून आपल्यापासूनच पाणी प्रबोधनासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. प्रचार, प्रबोधन आणि प्रतिबंध यांद्वारे जलजागृती सप्ताहात प्रत्येक घटक जलसाक्षर करा. पिण्यायोग्य पाणी नसेल, श्‍वास घेण्यायोग्य हवा नसेल व खाण्यायोग्य अन्न नसेल तर मानव पिढी कशी तग धरेल? आपण पुढच्या पिढीला कोणते जीवन देणार आहोत? याबद्दल प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करावा. पुढील पिढीसाठी पाणी वाचविण्यासाठी छोटे छोटे उपाय अमलात आणा.'' 

उदय गायकवाड म्हणाले, ""जलसेवक, जलप्रेमी आणि जलनायक या रूपात प्रत्येकाने काम करून जल साक्षरता या विषयात योगदान द्यावे. पाण्याच्या दैनंदिन वापराच्या पद्धतीत बदल करून जलमूल्यांची रुजवण पुढच्या पिढीच्या मनावर करणे गरजेचे आहे.'' पाण्यावर मीटर असणारी आणि सांडपाण्यावर अधिभार घेणारी कोल्हापूर महापालिका असल्याची सांगून सांडपाण्यावर 60 ते 65 टक्के प्रक्रिया कोल्हापूर महापालिकेतर्फे करण्यात येत असल्याबद्दल अभिनंदन केले. या वेळी त्यांनी एक लिटर पाण्यात चारचाकी गाडी धुण्याच्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले. 

अधीक्षक अभियंता साळुंखे यांनी पाणी वापराच्या सूक्ष्म नियोजनामध्ये पाणी वापर संस्थांचा सहभाग महत्त्वपूर्ण असून, जिल्ह्यात एकूण 1465 पाणी वापर संस्था असल्याचे सांगितले. 

जलजागृती सप्ताहानिमित्त सकाळी जलदिंडी काढण्यात आली. श्री. मास्तोळी, प्रा. पाटील, कार्यकारी अभियंता श्री. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अशोक भोईटे यांनी केले. 

शाहूंच्या जलव्यवस्थापनातून जिल्हा समृद्ध 
श्री. काटकर म्हणाले, ""प्रत्येकाने पाणी काटकसरीने वापरून जलस्रोत शुद्ध राखले पाहिजेत. राजर्षी शाहू महाराजांनी राधानगरी धरण बांधून अनेक पिढ्यांवर उपकार केले आहेत. त्यांच्या जलव्यवस्थापनाच्या आदर्शातून वाटचाल करत हा जिल्हा समृद्ध झाला आहे; पण आपण पुढच्या पिढ्यांना स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी या गोष्टी देऊ शकू का, याविषयी आत्मपरीक्षण करण्याची परिस्थिती आहे.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com