शेट्टी-सदाभाऊंच्या वादाचे मूळ कशात?

शेट्टी-सदाभाऊंच्या वादाचे मूळ कशात?

जिल्हा परिषद निवडणुकांचे एकदाचे सूप वाजले. पुढच्या घडामोडी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा प्रस्थापित पक्षांमध्ये होत राहतील. त्यावेळी सत्तेच्या खेळात सामील झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना मात्र स्वतःच केलेल्या अंतर्गत खेळ्या निस्तरण्यासाठीचा खटाटोप करीत बसावे लागेल. खासदार राजू शेट्टी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची सध्याची खटपट राजकीय अस्तित्वासाठी आहे. भाजपसोबत राहून संघटनेचे अस्तित्व कायम राहू शकत नाही हे शेट्टींचे; तर सत्तेचा लाभ घेऊन आपला विस्तार वाढवू, असं सदाभाऊंचे मत आहे. यातला विरोधाभास त्यांना फार काळ एकत्र ठेवू शकणार नाही. 

मी व्यक्तिस्वातंत्र्य मानणारा आहे...कोणी कुणावर आपले विचार लादू शकत नाही या उच्च विचारामागचा छोटा विचार इतकाच मी मंत्रिपद सोडायचे किंवा नाही हे मला कोणी सांगू शकत नाही. हाच मंत्री सदाभाऊंच्या विधानातील मथितार्थ. तो राजू शेट्टी यांनाही समजला आहे. यातली अधिक स्पष्टता त्यांनी शिवाराच्या पेरणी, मशागतीच्या शब्दात सांगितली आहेच. त्यांच्या मंत्रिपदाचा निर्णय संघटना करेल, असं खूप आधीच शेट्टींनी सांगितलं आहे. अशा उलटसुलट सवाल जबाबाच्या फेऱ्या होत राहतील. पूर्वी अशीच राजकीय करमणूक भ्रष्ट काँग्रेसवाले करायचे. जनतेला त्यात गुंतवायचे आणि आपला कार्यभार साधायचे आणि जनतेला कट्ट्यावर सोडायचे... असं सर्वच चळवळीतील कार्यकर्त्यांचं मत. 

देशात शेतकरी संघटनेच्या चळवळीचे बीजारोपण करणाऱ्या खासदार शरद जोशी यांनी अनेकवार उलटसुलट राजकीय भूमिका घेतल्या. त्यामुळे त्यांच्या राजकीयदृष्ट्या यशस्वी ठरलेल्या चेल्यांनी घेतल्या, तर त्यात काय बिघडले? त्यांनी जोशींकडून तेवढे अचूक घेतल्याचे आजवरच्या वाटचालीतून दिसते. 

खासदार  शेट्टी यांना लोकसभेच्या दोन निवडणुकांमध्ये  मिळालेल्या यशाचे श्रेय खासगीत काँग्रेसवाले नेहमीच घेतात. काँग्रेस आघाडीच्या वाटणीत त्यांचा हातकणंगले मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाटणीला जायचा. त्यामुळे राष्ट्रवादीचे उट्टे काढण्यासाठी काँग्रेसवाले त्यांना मदत करायचे. पण शेट्टींचे दोन्ही विजयांचे श्रेय काँग्रेसचे कधीच नव्हते. प्रस्थापित राजकारणी, साखर सम्राटांविरोधातील तो रोष होता. आपल्यासाठी कोणी तरी भांडतेय या प्रतिमेतच या दोन्ही विजयाचे मुख्य श्रेय सामावले आहे. काँग्रेसवाले फक्त वाहत्या गंगेत हात धुवून घेत होते.

सांगली-कोल्हापूर जिल्ह्याच्या दोन दशकभरांच्या  राजकीय प्रवासात भाजपच्या पश्‍चिम महाराष्ट्र दिग्विजयाने नवे संदर्भ तयार झाले आहेत. विधानसभेनंतर ते अधिक वेगाने बदलत आहेत. बघता बघता पश्‍चिम महाराष्ट्रातील भाजप राष्ट्रवादीचीच बी टीम झाली आहेत. ज्यांची साखर सम्राट म्हणून हेटाळणी केली, ज्यांनी सहकारी साखर कारखाने गिळंकृत केले म्हणून शेट्टी न्यायालयात गेले आहेत, अशा सर्व तत्कालीन भ्रष्टाचारी गणल्या गेलेल्या सर्वांची भरती आता भाजपमध्ये झाली आहे. 

या वाटचालीत आता शेट्टींना संघटनेचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी भाजपसोबत जाणे परवडणारे तर नाहीच उलट स्वतःच्या अस्तित्वाला विसर्जित करण्यासारखे  आहे असे वाटते. गेल्या दोन वर्षांत त्यांनी राज्यस्तरावर महादेव जानकर किंवा विनायक मेटे या भाजप मित्रांच्या सहकार्याने सतत सरकारविरोधी भूमिकेचा राग आळवला आहे. हाच राग त्यांना पुढे गायचा आहे. मात्र सत्ता नावाचा मोठा अडसर त्यांच्यापुढे आहे. सरकारमध्ये सामील झालेले सदाभाऊ यांना इतक्‍या लवकर सरकारविरोधी सूर लावणे त्रासाचे जाते आहे. 

दुसरीकडे भाजपच्या सहवासात गेलेल्या मराठवाड्यातील अनेक शेतकरी नेत्यांचा दाखला देऊन त्यांचा पाशा पटेल कसा झाला याची उजळणी करून शेट्टी सदाभाऊंना जागे करीत आहेत. सदाभाऊंना भाजपमध्ये मोठे राजकीय भवितव्य दिसते आहे, तर शेट्टींना भाजप संगतीत संघटनेला भवितव्य दिसत नाही. शेट्टींना त्यांच्या राजकारणासाठी शिराळ्याच्या शिवाजीराव नाईकांची मदत पुरेशी आहे. उर्वरित महाराष्ट्रातील कोणाही भाजप नेत्याची फिकीर करायचे त्यांना कारण नाही. काँग्रेसबाबत दोघांनाही परस्परांबाबत असलेला सॉफ्ट कॉर्नर पुढची लोकसभा  सर करण्यासाठी पुरेशी आहेत. कारण शेतकरी हिताच्या मुद्द्यावर आजघडीला त्यांच्या इतक्‍या उच्चारवाणीने बोलणारा दुसरा नेता अद्याप इथे तयार झालेला नाही. शेतकरी हिताची भाषा..साखर कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून करता येणार नाही. ते सुरक्षित अंतर राखले जावे यासाठीची शेट्टींची धडपड सदाभाऊंच्या सत्ताप्रेमाआड येत आहे. वादाचे मूळ इथे आहे. तो गुंता दोघेही किती शहाणपणाने सोडवतील यावर दोघांचे राजकीय हित सामावले आहे... शेतकऱ्यांचे नव्हे !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com