तत्त्वहीन आघाड्यांत ‘स्‍वाभिमानी’

raju-shetty-sadhabhau-khot
raju-shetty-sadhabhau-khot

अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील दिल्लीत झालेल्या लोकआंदोलनाचे राजकीय अपत्य म्हणजे अरविंद केजरीवाल; तर महाराष्ट्रातील ऊस आंदोलनाचे राजकीय अपत्य म्हणजे राजू शेट्टी. केजरीवाल यांचा ‘आप’ दिल्लीनंतर पंजाबच्या निवडणुकीत घोडदौड करीत आहे. दिल्लीतील आंदोलनानंतर केजरीवाल महाराष्ट्रात आले ते खासदार राजू शेट्टी यांच्या सांगलीतील मेळाव्यासाठी. गेल्या चार-पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. देशाच्या राजकीय अवकाशात केजरीवाल वादळात दिवा लावण्याचा प्रयत्न करीत आहेत; तर शेट्टी राजकीय वादळात पाचोळ्याप्रमाणे वाहत जात आहेत. या राम-लक्ष्मणाच्या जोडीतील दुसरे सदाभाऊ मंत्री आहेत आणि आता मुलाचे राजकीय बस्तान बसविण्याच्या प्रयत्नात आहेत.

ऊस आंदोलनाच्या निमित्ताने केलेल्या पेरणीचा हंगाम घ्यायचे दिवस आले आहेत, असा विचार करून सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात एकच रान उठवले आहे. 

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सध्या कोणत्या पक्षाबरोबर कुठे आघाडी आहे, हे खुद्द संघटनाही सांगू शकणार नाही. त्यांनी ‘राष्ट्रवादी आमचा शत्रू क्रमांक एक, असे लढतीचे सूत्र जाहीर केले आणि जमेल तिकडे हव्या तशा आघाड्या ते मांडत आहेत. त्यासाठी कधी काळी ज्या बंगल्यावर ऊस आंदोलनाचा भाग म्हणून दगड मारले, त्याच पतंगरावांच्या ‘अस्मिता’ बंगल्यावर त्यांनी नुकतीच पायधूळही झाडली. तिकडे साखर सम्राटांच्या घराणेशाहीवर आसूड ओढणारे सदाभाऊ आपल्या चिरंजीवासाठी आता आपली वैखरीची वाणी खर्ची पाडतील. 

भाजपची पश्‍चिम महाराष्ट्राची धुरा वाहणारे चंद्रकांत पाटील यांनी येनकेन प्रकारे भाजपचा विस्तार करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीतून नेते-कार्यकर्त्यांच्या झुंडीच्या झुंडी आयात करीत आहेत. यात मित्र पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना किंवा शिवसेना यांना ते खिजगणतीतही धरायला तयार नाहीत. कारण त्यांच्या मते स्वाभिमानीची योग्य बक्षिसी त्यांच्या पदरात टाकली आहे, आता त्यांनी आम्ही म्हणू तसे सुतासारखे सरळ यावे. त्यांच्या या यूज अँड थ्रो भूमिकेमुळेच संतापलेल्या शेट्टींनी भाजपचा हा उधळलेला वारू रोखण्यासाठी मिळेल त्या पद्धतीने अडथळे उभे करण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी ते सदाभाऊ सोबत आले तर ठीक; अन्यथा त्यांच्याविना, असा पवित्रा घेऊन दोन्ही जिल्ह्यात ते पळून खेळत आहेत. या साऱ्यातून चार-दोन जागा संघटनेच्या पदरात पडतीलही. कदाचित उद्याच्या सत्तेच्या समीकरणात ते काही पत्ते खेळूही शकतील. मात्र हे सारे दुरून त्रयस्थपणे पाहणारा शेतकरी संघटनेचा फाटका कार्यकर्ता, ‘याचसाठी केला होता का अट्टहास’ असा प्रश्‍न स्वतःला करीत असेल. सत्ताकारणापासून दूर राहून शेतकरी संघटनेचे अस्तित्व टिकवता येणार नाही, अशी ठाम भावना शेट्टींची झाली आहे. त्यांच्या या भूमिकेबाबत वाद, मतभेद असू शकतील. मात्र त्यासाठी निवडलेली ही वाट मात्र देवाच्या नव्हे तर चोराच्या आळंदीचीच आहे. विशुद्ध राजकारणाची नाही. स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याचीही नाही... ही वाट फक्त प्रवाहाचा...सत्तेचा पाईक होण्यासाठीचीच आहे, याबद्दल कुणाचेही दुमत  होणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com