रामराजेंचे एकाच बाणात चार पक्षी!

रामराजेंचे एकाच बाणात चार पक्षी!

शिवाजीरावांवर निगाहे, निशाना ‘कही’ पे; पुढील राजकीय खेळीसाठी पोषक
सातारा - राज्याच्या राजकारणात मास्टर असलेल्या विधान परिषद सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनी जिल्ह्याच्या राजकारणातही ‘मास्टर’ चाल खेळत एकाच बाणात चार पक्षी मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ऐन वेळी आनंदराव शेकळे- पाटील यांनी अध्यक्षपदासाठी आव्हान निर्माण केल्याने गोची झाली असतानाही थेट ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार यांनीही रामराजेंचा शब्द उचलला. यामुळे सुभाष नरळे अध्यक्ष झाल्याने रामराजेंनी अनेक राजकीय समीकरणे साध्य केली.

जिल्ह्याच्या राजकारणावर रामराजेंनी नेहमीच वचक ठेवलेला आहे. माजी अध्यक्ष निवडीत अरुणादेवी पिसाळ, रामराजे यांच्या भावजयी, संजीवराजे नाईक- निंबाळकर यांच्या पत्नी शिवांजलीराजे यांच्यात चुरस वाढली होती. त्या वेळी अरुणादेवींना संधी देता शिवांजलीराजेंना थांबविण्यात आले; परंतु संजीवराजेंना उपाध्यक्षपद देण्यात आले. अडीच वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा अध्यक्षपद माणिकराव सोनवलकर यांना देऊन जिल्हा परिषदेची सत्ता आपल्याकडे ठेवली. मात्र, त्या वेळी माण तालुक्‍यातील सुभाष नरळे, शिवाजीराव शिंदे यांना संधी न मिळाल्याने पक्षातून नाराजीही व्यक्‍त झाली.

ती दूर करण्यासाठी अचानक माणिकरावांना पदावरून दूर करत माण तालुक्‍यास संधी देण्याचे ठरविण्यात आले; परंतु खंडाळ्यालाही आजवर अध्यक्षपद मिळाले नसल्याने, तसेच लोणंदच्या आनंदराव शेळके- पाटील यांना शेवटीची संधी असल्याने त्यांनीही ताकद पणाला लावली. आमदार मकरंद पाटील यांनीही ताकद आजमावल्याने तेड निर्माण झाली; परंतु अखेरीस रामराजेंनी शरद पवार यांच्या ‘कोर्टा’त चेंडू ढकल्याने सुभाष नरळेंचे नाव निश्‍चित झाले.
दरम्यानच्या काळात सभापती राजीमान्यावरून कृषी सभापती शिवाजीराव शिंदे यांनी थेट पक्षाला आव्हान देत न्यायालयीन लढाई खेळली होती. त्यात त्यांना यशही आले. मात्र, त्यांचा उट्ट्या काढण्यासाठी ‘राष्ट्रवादी’तील अनेक सदस्यांनी कंबर कसली आहे. काहींनी अविश्‍वास ठराव आणण्यासाठी विशेष सभा बोलावण्याची मागणी केली आहे. मात्र, सह्या करणाऱ्या अनेक सदस्यांचे डोळे शिवाजीराव शिंदेंवर असले,

तरी निशाना मात्र खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक, उपाध्यक्ष रवी साळुंखे यांच्यावरच असल्याची चर्चा रंगत आहे. शिवाजीराव शिंदेंवर अविश्‍वास ठराव आणला, तरी अध्यक्षपद माण तालुक्‍यात असल्याने त्याबाबत माण तालुका राष्ट्रवादीतून जास्त प्रतिक्रियाही उमटणार नाही, हाही डाव अध्यक्ष निवडीतून साध्य केला जाणार आहे.

पुढील आरक्षण महिला वर्गास असल्याने पुढील अध्यक्ष निवडीतही रस्सीखेस होईल. सध्या माण तालुक्‍यास अध्यक्षपदाची संधी दिल्याने पुढील वेळी माण तालुका दावेदार राहिलच असे नाही. त्यामुळे शिवांजलीराजेंना संधी मिळण्याची दारे खुली झाली, तसेच श्री. नरळे हे अध्यक्ष झाल्याने रामराजेंची सत्ताही अधोरेखित झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com