संवाद गवसला... संवाद हरवला...

संवाद गवसला... संवाद हरवला...

गावगाड्याच्या चाकांची कर... कर वाढली; गावपणाचा चेहरा बदलला
कोल्हापूर - काळाच्या ओघात खेड्यापाड्यांतील बदल विस्मयचकित करणारे ठरत आहेत. संवाद आणि माध्यमक्रांतीमुळे शहरी आणि ग्रामीण भागातील सांस्कृतिक अंतर घटत आहे. नव्या माध्यमांसह देशासह परदेशांत वास्तव्य करणारी पिढी या बदलाची वाहक आहे. यातील सामाजिक आणि सांस्कृतिक बदल परिणामकारक असले, तरी आर्थिक बदलांमुळे परंपरागत गावगाड्याचे अस्तित्व पूर्णतः बदलत आहे. नव्या-जुन्याच्या संवाद-विसंवादात गावपण हरवतही आहे, अन्‌ गवसतही आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची उद्या (30 एप्रिल) जयंती. यानिमित्त राज्यातील "गावगाड्याचा' मागोवा घेतला असता, तेथील सर्वच स्तरांवरील बदल प्रकर्षाने समोर आले. अर्थातच स्वातंत्र्यपश्‍चात राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतरांनी ग्रामसंस्कृतीलाही कात टाकण्यास भाग पाडले.

संवादक्रांती...
संवादक्रांती जितकी शहरात, तितकीच ती ग्रामीण भागात रुजली. टीव्ही, मोबाईलसारख्या माध्यमांनी संवाद क्षेत्रात क्रांती केली, त्यासाठी ग्रामीण- शहरी भेदभावच ठेवला नाही. पंचवीस वर्षांपूर्वी तालुका पोस्टात एखादा काळा दूरध्वनी संच असायचा. पत्र नियमित, तर तार हे तातडीच्या संवादाचे साधन. वर्षे सरली "दूरसंवादा'चे जाळे पसरले. आज एखाद्या खेड्यातील मुलगा परदेशात असेल आणि त्याला अपत्यप्राप्ती झाली, तर नातवाचे तोंड थेट व्हिडिओ कॉलवरून म्हातारेकोतारे पाहात आहेत. संवादक्रांती झाली खरी; पण खेड्यातील संवादही कुठेतरी हरवतोय का, असाच प्रश्‍न आहे. सांजवेळ झाली की बैठका मारत फुलणारे गावागावांतील पार आता नावालाच उरलेत. घरातील संवादही दुरावला. दोन पिढ्यांतील अंतर अन्‌ कुटुंबातही कटू प्रसंग वाढलेत.

बारा बलुतेदारांचा संघर्ष
खेड्यातल्या गरजा खेड्यातच पुऱ्या करणाऱ्या कारागिरांना पूर्वी खूपच महत्त्व होते. नाभिक, लोहार, सुतार, चांभार, कुंभार, शिंपी इत्यादी बारा बलुतेदार म्हणजे गावची शानच. या कारागीर मंडळींनी तयार केलेल्या साहित्याचेही वैशिष्ट्य असायचे. पण, यांत्रिकीकरण आले अन्‌ संघर्ष सुरू झाला. बलुतेदारी हळूहळू लुप्त होत चाललीय. पुढच्या पिढीतील अनेकांनी मात्र व्यावसायिक बदल करत नवे मार्ग शोधले.

चार चाकांचे गाव
यांत्रिकीकरणात शेतकरी कुटुंबातील संपन्नतेची साक्ष देणारी सर्जा-राजाची जोडी आता हौसेखातरच राहिलीय. सर्जा-राजा गेला, तशी सुबत्ताही जाऊ लागली. बैलजोडी आर्थिकदृष्ट्या सांभाळणे अडचणीचे ठरू लागले अन्‌ गोठ्याची जागा चार चाकी यंत्राने घेतली. यंत्राने काम वेगवान झाले; पण गोठ्यातील वात्सल्य लोपले.

शिक्षणाचे इंग्रजीकरण
जिल्हा परिषदेची शाळा म्हणजे गावातलं शिक्षणाचं माहेर; पण अलीकडच्या शिक्षणातील स्थित्यंतराचे परिणाम ग्रामीण भागात जाणवताहेत. मुलं प्रगतीत मागे राहू नयेत म्हणून "झेडपी'ऐवजी शहरातील इंग्रजी शाळांचा आग्रह वाढला. जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडू लागल्या.

तुकड्यांची शेती वाढली
कृषकाची एकत्रित कुटुंब व्यवस्था हीच कृषिसंस्कृती. परंतु मोठ्या कुटुंबाचे विभाजन होऊ लागले, तसे तुकड्यांची शेती वाढली, अन्‌ समस्याही. हेक्‍टरचे एकरात, एकराचे गुंठ्यात आले, अर्थार्जन गंभीररीत्या कमी होऊ लागले. परिणामी, कुटुंबातील एकाला तरी नोकरीसाठी गाव सोडावे लागले. आज गावागावांत ज्येष्ठांचाच भरणा पन्नास ते सत्तर टक्के आहे. शेतीवरील अवलंबित्व कमी झाल्याने अनेक पिकांची ओळख असणारी गावे नकाशातून गायब होत आहेत.

लग्नसोहळ्यात शहरी बाज
लग्न म्हटलं की खेड्यातील कुटुंबांच्या दृष्टीने मोठा मंगल सोहळाच! मात्र पूर्वीची पाच-पाच दिवसांची लग्ने दिवसावर आली. जुन्या पिढीचे विचार बाजूला ठेवून पाच दिवसांचा खर्च एकाच दिवसात होऊ लागला. ग्रामीण भागातील नोकरदार पिढीने या सोहळ्याला शहरी साज चढविला आणि मूळ आनंद सोहळा, औपचारिक आणि आटोपता होऊ लागला.

बदल अपरिहार्य असतात; पण ते तुम्ही कोणत्या विचाराने घेता हे महत्त्वाचे आहे. शेतीचा विचार करायचा तर यांत्रिकीकरणामुळे अनेक दिवसांची शेतकामे काही तासांत होऊ लागली, हे प्रगतीचे लक्षणच. समाजव्यवस्थेबाबतही तसेच म्हणावे लागेल. पिढीप्रमाणे होणारे बदल हे शहरी असोत अथवा ग्रामीण, ते अपरिहार्यच आहेत. काही घटकांना याचा फटका बसत असला, तरी ते स्वीकारणे क्रमप्राप्त आहे.
- सदानंद देशमुख, ज्येष्ठ साहित्यिक

कुटुंब व्यवस्थेतील बदल हा खेड्यांच्या बदलांसाठी महत्त्वाचा मुद्दा मानता येईल. पूर्वी एकत्र कुटुंब असे. पुढे शेतीची वाटणी झाली तसे उत्पन्नाच्या साधनाचेही विकेंद्रीकरण झाले. नोकऱ्यांमुळे आर्थिक अवलंबित्वही बदलले. पूर्वी जो शेतीचा मुख्य भार पेलायचा त्याला मान असायचा; पण नव्या रूपात जो चांगली नोकरी करतो, पैसा मिळवितो, त्यालाच मान मिळू लागला. शेती करणारा दुर्लक्षित राहू लागला. परिणामी कुटुंबातील ईर्षा वाढली. कुटुंबे विभक्त होऊ लागली. एकीकडे सुविधा वाढून माणूस संपन्न होत असताना दुसरीकडे बिघडलेली ही व्यवस्थाही लक्षात घ्यावी लागेल.
- तारा भवाळकर, ज्येष्ठ साहित्यिक

गावांचा विकास झाला हे जरी खरे असले, तरी वाढत्या सोयींमुळे गावपण हरवले, हे खरेच. पूर्वी ग्रामपंचायतीला प्रतिष्ठा होती. गावचे तंटे गावातच मिटायचे. काही वर्षांत हे वाद तहसील कार्यालय, पोलिस स्टेशनला जाणे वाढले. राजकीय गट-तट प्रबळ झाले. समस्या गावातील पुढारी सोडवतीलच, याचा विश्वास ग्रामस्थांना राहिला नाही. बदलत्या प्रवाहात गावे झपाट्याने सामील; पण सण, वार आपुलकीही मागे पडली. त्याचा परिणाम खेड्यातील समाजजीवनावर झाला, रुक्षपणा वाढला. यामुळेच खेडी आज सर्वार्थाने सुखी आहेत का, असा प्रश्न पडतो.
- पोपटराव पवार, कार्याध्यक्ष, आदर्श गाव योजना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com