हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेरच 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 एप्रिल 2017

आंब्यांचे भाव 

  • रत्नागिरी हापूस : प्रति 1 डझन : 400 ते 800 रुपये. 
  • देवगड हापूस : प्रति 1 डझन : 500 ते 1000 रुपये. 

सांगली : सांगलीतील विष्णूअण्णा फळ मार्केट बाजारात देवगड, रत्नागिरी हापूसची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे; मात्र दर हे सर्वसामान्यांना अजूनही न परवडणारेच आहेत. फळ मार्केटमध्ये देवगड हापूसची रोज 4000 पेट्यांची आवक होते, तर रत्नागिरी हापूसची 2000 पेट्यांची आवक होत आहे, अशी माहिती आंबा व्यापारी हाजी मुसाभाई आबालाल बागवान यांनी दिली. 

रत्नागिरी हापूसचा दर 400 ते 800 रुपये प्रति डझन आहे, तर देवगडचा दर हा 500 ते 1000 रुपये प्रति डझन आहे. 

कोकणातून आवक वाढली आहे; मात्र दर हे अजूनही सर्वसामान्यांना न परवडणारेच असल्याने ग्राहक आंबा खरेदीपासून दूरच आहे. 

विष्णूअण्णा मार्केट यार्ड येथून प्रामुख्याने फळ बाजारात निरनिराळ्या फळांची आवक होते. सध्या आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे. कोकणातील आंब्याची आवक वगळता मात्र इतर प्रदेशातील आंब्यांची अपेक्षित आवक अजून झालेली नाही. 

फळ विक्रेते माणिक पाटील म्हणाले, ''सध्या आवक वाढली आहे; मात्र आंब्याचे भाव तेजीत आहेत. दरवर्षी अक्षय तृतीयेपासून आंब्यांना मागणी वाढते. पावसाळ्यापर्यंत आंब्याचा हंगाम राहत असल्याने या वर्षी फार थोड्या काळासाठी आंब्याची उलाढाल राहण्याची शक्‍यता आहे.'' 

आंब्यांचे भाव 

  • रत्नागिरी हापूस : प्रति 1 डझन : 400 ते 800 रुपये. 
  • देवगड हापूस : प्रति 1 डझन : 500 ते 1000 रुपये. 

पुढील आठवड्यात कर्नाटकी आंबा 
विष्णूअण्णा फळ मार्केटमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे आंबे येतात. त्यात कोकणातील हापूसला व्यापारी आणि ग्राहकांची पसंती असल्याने तो नेहमीच नंबर वन असतो. रत्नागिरी हापूस व देवगड आंब्यांबरोबरच पुढील आठवड्यात कर्नाटक व मद्रास येथून आंब्यांची मोठ्या प्रमाणात आवक होणार आहे. 

'हापूस' म्हणून दुसराच आंबा 
कोकणातील हापूसची एक वेगळीच चव असते. त्यामुळे रत्नागिरी व देवगडच्या हापूस आंब्याला प्रचंड मागणी आहे; मात्र त्याचे दरही तेवढेच तेजीत आहेत. किरकोळ व्यापाऱ्यासह सर्वसामान्यांना ते न परवडणारेच आहेत. याचाच फायदा घेत सांगलीतील काही किरकोळ व्यापारी देवगड व रत्नागिरीच्या हापूस आंब्याच्या पेटीत इतर आंबे घालून ते रत्नागिरी व देवगडचा आंबा म्हणून ग्राहकांना देत आहेत. त्यामुळे ग्राहकांची मोठी फसवणूक होत आहे.