डिझेल दरवाढीने एसटीचा प्रवास महागणार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

कोल्हापूर : गेल्या दहा महिन्यांत तब्बल आठ रुपयांनी डिझेलची दरवाढ झाल्याने एसटी महामंडळाला रोज 97 लाखांचा तोटा सोसावा लागत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी महामंडळाने 10 ते 15 टक्के प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला. याचा थेट परिणाम सार्वजनिक प्रवासी वाहतुकीवर होणार आहे. सर्वसामान्य प्रवाशाला कमीत कमी एक ते पाच रुपये प्रतिटप्पा भाडेवाढ द्यावी लागेल. 

राज्यातील सर्वसामान्यांपासून उच्चवर्गीयांपर्यंत सर्व स्तरातील प्रवाशांना उपयुक्त ठरणारी एसटीची प्रवासी सेवा खेड्यापाड्यात प्रवासी वाहतूक करते. त्यामुळे नित्य व्यवहार एसटीच्या गतीवर अवलंबून आहेत. अशा उपयुक्त सेवेतील संभाव्य भाडेवाढ सर्वसामान्यांसाठी संकट ठरणार आहे. एसटीची भाडेवाढ करण्यासाठी राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी घ्यावी लागते. त्यासाठी भाडेवाढीचा प्रस्ताव त्रयस्त यंत्रणेमार्फत केला जातो. या भाडेवाढीच्या प्रस्तावाला एसटीच्या संचालक मंडळाची मंजुरी लाभली, की राज्य परिवहन प्राधिकरणाकडे हा प्रस्ताव सादर केला जातो. 

असा प्रस्ताव तयार करण्यामागे मुख्यत्वे डिझेलचे दर, टायरच्या वाढलेल्या किमती, गाड्यांच्या चेसीसच्या वाढलेल्या किमती व कामगार महागाई भत्त्यात झालेली वाढ, या बाबींवर एसटीचा खर्च वाढतो आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये 54.74 रुपये लिटर असलेले डिझेल एप्रिलमध्ये 63.78 रुपयांवर पोचले. एसटीला रोज 12 लाख 12 हजार 500 लिटर डिझेल लागते. जुलैच्या तुलनेत एसटीला रोज 97 लाख रुपये जादा मोजावे लागतात. 

त्याबरोबर एसटीच्या चेसीस वायरच्या किमती वाढल्या आहेत. यामुळे गेली दोन वर्षे नवीन एसटी गाड्या खरेदीही बंद आहे. 

2014 मध्ये 107 टक्के महागाई भत्ता होता. तो 2018 मध्ये 136 टक्‍क्‍यांपर्यंत वाढला आहे. यात प्रलंबित वेतनवाढीचा बोजा महामंडळावर पडेल. यातून एकूण खर्चात वेतनावर सध्या 44 टक्के होणारा खर्च भविष्यात 50 टक्‍क्‍यांवर जाणार आहे. त्यातून एसटीला एक हजार कोटींचा वार्षिक तोटा सहन करावा लागेल. या सर्व पार्श्‍वभूमीवर एसटी महामंडळाने प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार ही 10 ते 15 टक्के वाढ होईल.

Web Title: Rates for ST Transport will be revised due to hike in Diesel prices