बॅंकिंग व्यवहारांसाठी रेशनिंग दुकाने सज्ज 

हेमंत पवार
सोमवार, 20 मार्च 2017

कऱ्हाड - ग्रामीण भागात बॅंका पोचल्या नसल्यामुळे तेथील लोकांना गावातच बॅंकांतील पैशांचे व्यवहार करता यावेत, यासाठी रेशनिंग दुकानातच पैशांची देवाण-घेवाण करण्याची सोय शासनाने केली आहे. पुरवठा विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील 1,585 रेशनिंग दुकानदारांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, त्यांना "मायक्रो एटीएम मशिन'चेही वाटप करण्यात आले आहे. सध्या बॅंकांशी संबंधित दुकानदारांचा करार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आता लवकरच गावातच बॅंकांतील पैशांची देवाण-घेवाण सुरू होणार आहे. 

कऱ्हाड - ग्रामीण भागात बॅंका पोचल्या नसल्यामुळे तेथील लोकांना गावातच बॅंकांतील पैशांचे व्यवहार करता यावेत, यासाठी रेशनिंग दुकानातच पैशांची देवाण-घेवाण करण्याची सोय शासनाने केली आहे. पुरवठा विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील 1,585 रेशनिंग दुकानदारांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, त्यांना "मायक्रो एटीएम मशिन'चेही वाटप करण्यात आले आहे. सध्या बॅंकांशी संबंधित दुकानदारांचा करार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आता लवकरच गावातच बॅंकांतील पैशांची देवाण-घेवाण सुरू होणार आहे. 

जिल्ह्यातील मोठ्या गावांच्या ठिकाणीच बॅंकांचे जाळे आहे. त्या परिसरातील गावांच्या लोकांना संबंधित ठिकाणच्या बॅंकेत जावूनच सर्व व्यवहार करावे लागतात. त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसाही खर्च होतो. शिवाय तेथे गेल्यावर बॅंकेतील रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. त्याचा त्रास त्यांना सहन करावा लागतो. या सर्वांवर पर्याय म्हणून आता शासनाने संबंधित ग्रामीण व दुर्गम-डोंगराळ भागातील लोकांनाही त्यांच्या गावातच बॅंकेचे व्यवहार होण्याची सोय व्हावी यासाठी रेशनिंग दुकानातच बॅंकेतील पैशांची देवाण-घेवाण करण्याची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता जिल्ह्यातील सर्व रेशनिंग दुकानांत संबंधित मशिन देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. संबंधित मशिन चालवायचे कसे, व्यवहार कसे करायचे, याचीही माहिती संबंधित दुकानदारांना देण्यात आली आहे. सध्या रेशनिंग दुकानदारांना देण्यात आलेली मशिन आणि बॅंका यांचे लिंकअप करून बॅंकांशी दुकानदारांचे करार करण्याचेही काम सुरू आहे. त्यामुळे आता लोकांना गावातच बॅंकेतील पैशांचे व्यवहार करता येणार आहेत. त्यामुळे लोकांची चांगली सोय होणार आहे. 

दुकानदारांना कमिशन 
बॅंका आणि नागरिक यातील दुवा म्हणून रेशनिंग दुकानदार यापुढे काम करणार आहेत. त्यांच्याद्वारे बॅंकांत चालणारे आर्थिक व्यवहार रेशनिंग दुकानांत होणार आहेत. त्यासाठी त्यांना शासनाकडून कमिशन देण्याचीही व्यवस्था करण्यात आल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली. 

धान्यही पीओएसद्वारे 
अनेकदा रेशनिंगमध्ये काळाबाजार होतो, अशी चर्चा होते. त्यावर नियंत्रण आणून संबंधित लाभार्थ्यालाच धान्य मिळावे, यासाठी आता "पॉइंट ऑफ सेल'द्वारे (पीओएस) संबंधित लाभार्थ्याला धान्य देण्याची सोय करण्यात आली आहे. संबंधित मशिनद्वारे लाभार्थ्याला धान्य देताना त्याचे "थम इंप्रेशन' घेण्यात येईल. त्यामुळे संबंधिताला किती धान्य, किती दराने दिले याची माहिती पुरवठा विभाग आणि लाभार्थ्याला होणार आहे. त्यामुळे आपोआपच गैरप्रकारावर निर्बंध येतील. 

""बॅंकांचे आर्थिक व्यवहार रेशनिंग दुकानांतच व्हावेत, यासाठी शासनाच्या आदेशनुसार जिल्ह्यातील सर्व रेशनिंग दुकानदारांना मशिन वाटप करण्यात आली आहेत. त्यासाठी संबंधित दुकानदारांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. त्यांचे बॅंकांशी टायअप करण्याचे काम सुरू आहे. येत्या काही दिवसांतच ही सुविधा सुरू होईल.'' 
-वसुंधरा बारवे, जिल्हा पुरवठा अधिकारी, सातारा 

Web Title: Ration shops ready for banking transactions