यशाचा पासवर्ड - जनसंपर्क

यशाचा पासवर्ड - जनसंपर्क

दांडगा जनसंपर्क हे सध्याच्या काळातील यशाचे एक उत्कृष्ट परिमाण बनले आहे. आपण आपल्या जीवनात जेवढी माणसे जोडाल तितकी यशाची खात्री वाढते, हा नव्या काळाचा नवा मंत्र आहे. केवळ पुस्तक वाचण्यापेक्षा आजूबाजूची माणसे वाचता यायला हवीत, त्यांच्याशी हितगुज साधता यायला हवे, लोकसंग्रह वाढवता यायला हवा. तेव्हाच प्रत्येक माणसाच्या अंगी असलेल्या प्रचंड क्षमतांची जाणीव आपल्याला होईल. त्या क्षमतांचा प्रभावी वापर करून प्रत्येकाला अपेक्षित उद्दिष्ट सहज गाठता येईल. कारण प्रभावी जनसंपर्क हाच बदलत्या जगाचा सक्‍सेस पासवर्ड आहे.

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे किंवा स्पर्धेत स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करू पाहणारे बरेच तरुण स्पर्धेची लढाई एकटेच लढत असताना दिसतात. अगदी पहिल्या दिवसापासून आपला वेगळा स्वतःचा एक कोश तयार करून त्यातच स्वतःला जखडून घेण्याकडे अनेकांचा ओढा असतो. बाहेरील जगाशी कामापुरता संपर्क ठेवावा व एरव्ही आपण आपल्याच विश्‍वात रममाण राहून अभ्यास करीत राहावे, अशी सवय काहींनी स्वतःला लावून घेतलेली असते.

काही अंशी हे तंत्र बरोबर असले तरी हमखास यशासाठी एकमेका सहाय्य करू हे ब्रीद अंगिकारलेच पाहिजे. स्वतःच्या कोशातून बाहेर पडून एकाच ध्येयाकडे वाटचाल करणाऱ्याचा शोध घेता आला पाहिजे. अशा समविचारी लोकांना बरोबर घेता आले, त्यांच्याकडील ज्ञानाचा, क्षमतांचा, विविध तंत्रांचा खुबीने वापर करता आला, तर आपल्याला व इतरांनाही मिळणाऱ्या यशाची शक्‍यता कैक पटीने वाढते.

जनसंपर्क म्हणजे काय ?
माणसे जोडण्याची कला म्हणजे जनसंपर्क होय. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आजूबाजूच्या लोकांशी दररोज संपर्क येत असतोच. फक्त काहीच जण आपल्या आजूबाजूच्या लोकांना हाताळण्याचे, त्यांच्याशी संपर्क वाढवण्याचे व लोकांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा करून घेण्याचे कौशल्य विकसित करतात. असे करताना आपल्याही ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा समोरील व्यक्तीला होऊन त्याचाही सर्वांगीण विकास होईल, याची काळजी घेतली जाते. त्यामुळे माणसांचा लोकसंग्रह वाढून स्पर्धेच्या युगात आपल्याला हवे असलेले यश अशा लोकसंग्रहाच्या बळावर मिळवता येते. म्हणून तर सध्याच्या काळात माणसांच्या इतर स्थावर व जंगम संपत्तीइतकीच किंमत त्याच्या जनसंपर्काला दिली जाते आहे. कॉर्पोरेट जगात तर माणसाचा जनसंपर्क उमेदवाराची निवड करताना सर्वांत प्रथम अभ्यासला जातो. 

जनसंपर्क कौशल्याचे महत्त्व
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांनी जाणीवपूर्वक या जनसंपर्काचे कौशल्य अंगी बाणवले तर याची मधुर फळे नक्कीच चाखायला मिळतील. कारण आज या स्पर्धा परीक्षेचे स्वरूप अत्यंत गुंतागुंतीचे झालेले आहे. या बदलत्या स्वरूपामुळे अनेक तरुण गोंधळून गेलेले आढळतात. अशा परिस्थितीत जर तुमचा जनसंपर्क चांगला असेल, तर अनेक जुन्या जाणत्या लोकांची तुम्हाला सहज मदत घेता येऊ शकते. अनुभवी व्यक्तीचा सल्ला व मार्गदर्शन आपल्याला अभ्यासाची नवी ऊर्जा देते. 

या क्षेत्रातील लोकांच्या जितक्‍या जास्त ओळखी तेवढे स्वतःचे कष्ट कमी होतात. मग संदर्भ साहित्य असो, वा बदललेला अभ्यासक्रम, मुलाखतीविषयी सल्ला असो, वा पेपर सोडवण्याचे तंत्र असो, परीक्षेच्या तारखा असो वा नैराश्‍येतून बाहेर पडण्याचे मार्गदर्शन, अशा अवघड वळणावर आपल्याला ओळखीचा एखादा नक्की भेटतोच जो आपल्याला जन्मभर पुरेल इतके देऊन जातो. हे केवळ जनसंपर्कामुळेच शक्‍य होते. म्हणून स्पर्धेत उतरलेल्या स्पर्धकाने आपला जनसंपर्क एकदा नक्कीच तपासून पाहायला हवा. या कौशल्यात आपण कमी पडत असू तर तो वाढवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवा.

चला जनसंपर्काची कला शिकूया

 जनसंपर्क वाढवण्यासाठी सतत माणसाच्या मागे फिरावे लागते, हा सर्वांत मोठा गैरसमज आहे. आपण दैनंदिन अभ्यासात व्यत्यय येऊ न देताही जनसंपर्क वाढवू शकतो.
 आपल्याला आपले ध्येय स्पष्ट माहीत हवे. त्यासाठी आपल्याला कोण मदत करू शकतो, याची जाणीव हवी. कोणत्या व्यक्तीशी संपर्क वाढवायचा नाही, हे अगोदरच ठरवायला हवे. या बाबी नक्की झाल्या असतील तर आपण जनसंपर्क नक्की वाढवू शकता. काही सवयी आपण स्वतःला लावून घ्या आणि जादू बघा.
 त्या सवयीमध्ये सतत हसरा चेहरा असावा. कोणीही एखादी चांगली गोष्ट केली, तर त्याचे तोंड भरून कौतुक करावे.  
 आपल्या मित्राशी, नातेवाईकांशी, शिक्षकांशी बोलताना अगर वागताना आपली काही चूक झाली तर मोठ्या मनाने ती स्वीकारायला हवी.
 कोणाशीही जिलस न होता कर्तृत्वाचा सन्मान करा. दुसऱ्याला माफ करायला शिका.
 लोकांच्या वाढदिवसाला व इतर सण- समारंभास मनापासून शुभेच्छा द्या. आपल्या चालण्यात, बोलण्यात व वागण्यात जिव्हाळा आला की, तुम्ही या जगातील सर्वांत मोठा चुंबक होता. अनेक लोकांना तुमच्याकडे खेचून घेता येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com