‘रयत’ची आता मिलिटरी ॲकॅडमीही!

दिलीपकुमार चिंचकर
मंगळवार, 9 मे 2017

राज्यात सात ठिकाणी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रे सुरू करणार; शिक्षणाबरोबर प्रशिक्षणही मिळणार

सातारा - युवकांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, त्यांना नोकरीच्या संधी मिळावी, देशसेवा करता यावी, यासाठी रयत शिक्षण संस्थेने रयत मिलिटरी ॲकॅडमीची स्थापना केली आहे. ॲकॅडमीच्या माध्यमातून राज्यात सात ठिकाणी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू केली जात आहेत. त्यामध्ये लष्करी सेवेची परंपरा असलेल्या अपशिंगेची (ता. सातारा) निवड केली आहे. या केंद्रातून महाविद्यालयीन, तसेच इतर युवकांना भरतीचे प्रशिक्षण दिले जाईल.

रयत शिक्षण संस्थेचा ‘गुरुकुल’ पॅटर्न लौकिक मिळवित आहे. युवकांना देशसेवा करता यावी व नोकरीही मिळावी, यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. अनेक युवक पदवी घेतात; पण त्यांना नोकरी मिळतेच असे नाही. त्यातून बेरोजगारी वाढत आहे. या युवकांना लष्करात करियर करण्याची संधी मिळावी, यासाठी संस्थेने रयत मिलिटरी ॲकॅडमीची स्थापना केली आहे.

दहा वर्षांपूर्वी कर्जत (जि. नगर) येथे प्रथम हा प्रयोग केला. तेथील महाविद्यालयात भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू केले. अकरावी- बारावी, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. तीन महिन्यांच्या प्रशिक्षणात दरोरज चार तास ठेवण्यात आले. दोन तास शारीरिक शिक्षण व दोन तास भरतीच्या परीक्षेसाठीचा अभ्यास, असे प्रशिक्षणाचे स्वरूप ठेवले. भरती परीक्षेतील सामान्यज्ञान, गणित आणि विज्ञान शिकविले जाते, तर शारीरिक क्षमता वाढीचेही प्रशिक्षण दिले जाते. निवृत्त लष्करी अधिकारीही मार्गदर्शन करतात. त्यास कर्जतमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. प्रा. संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली युवक महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच हे प्रशिक्षणही घेऊ लागले. कर्जत केंद्रातून आजवर सुमारे ५०० विद्यार्थी पोलिस, लष्कर, सीमा सुरक्षा दल, रेल्वे सुरक्षा दल अशा विविध सेवेत दाखल झालेत. 

हा उपक्रम आता राज्यभर राबवला जाईल. राज्यांत सात जिल्ह्यांत अशी प्रशिक्षण केंद्रे उभारली जाणार आहेत. पुणे, नगर, सातारा, रायगड, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे. अपशिंगे (ता. सातारा) येथे लवकरच अद्ययावत भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे. या केंद्रात संस्थेच्या कनिष्ठ व उच्च महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना, तसेच इतर युवकांनाही प्रवेश दिला जाणार आहे.

‘रयत’ची हुतात्मा कोळींना आदरांजली
दुधगाव (ता. सांगली) येथील नितीन कोळी हे लष्करी जवान नुकतेच कुपवाडा येथे हुतात्मा झाले. त्यांची वीरपत्नी संपत्ती यांचे शिक्षण एमएडपर्यंत झाले आहे. त्यांना इतरत्र नोकरी मिळत होती. मात्र, त्यांनी ‘रयत’मध्ये सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली. संस्थेने त्यांची इच्छा मान्य केली असून, त्यांना नोकरीची संधी दिली आहे. 

केवळ पदवीने पोट भरण्याचे शिक्षण मिळत नाही. बेरोजगारी कमी करायची असेल, तर युवकांना इतर संधी आपण मिळवून दिल्या पाहिजेत. तसे शिक्षण, प्रशिक्षण दिले पाहिजे. म्हणूनच ‘रयत मिलिटरी ॲकॅडमी’चा प्रयोग राबवीत आहोत. 

- डॉ. अनिल पाटील, कार्याध्यक्ष, रयत शिक्षण संस्था, सातारा