कौशल्य विकासासाठी ‘रयत’चे पुण्यात केंद्र

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

शरद पवार; कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार डॉ. अनिल काकोडकर यांना प्रदान

सातारा - जागतिक स्तरावरील बदलांनी नव्या पिढीत नैराश्‍य येणार नाही, याची दखल घेऊन आपल्याला पावले टाकावी लागणार आहेत. तसा कार्यक्रम हाती घ्यावा लागणार आहे. सध्या सरकारने कौशल्य विकासाला प्राधान्य दिले आहे. रयत शिक्षण संस्थेतही तसे शिक्षण दिले पाहिजे. पुण्यात संस्थेच्या वतीने त्यासाठी केंद्र सुरू करणार असून, केवळ ‘रयत’ मधीलच नव्हे तर सर्व संस्थांतील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येईल, अशी माहिती माजी केंद्रीय कृषिमंत्री व संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज दिली.

शरद पवार; कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार डॉ. अनिल काकोडकर यांना प्रदान

सातारा - जागतिक स्तरावरील बदलांनी नव्या पिढीत नैराश्‍य येणार नाही, याची दखल घेऊन आपल्याला पावले टाकावी लागणार आहेत. तसा कार्यक्रम हाती घ्यावा लागणार आहे. सध्या सरकारने कौशल्य विकासाला प्राधान्य दिले आहे. रयत शिक्षण संस्थेतही तसे शिक्षण दिले पाहिजे. पुण्यात संस्थेच्या वतीने त्यासाठी केंद्र सुरू करणार असून, केवळ ‘रयत’ मधीलच नव्हे तर सर्व संस्थांतील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येईल, अशी माहिती माजी केंद्रीय कृषिमंत्री व संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज दिली.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथे कर्मवीर समाधी परिसरात श्री. पवार यांनी कर्मवीर समाधीस अभिवादन केल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात श्री. पवार बोलत होते. पालकमंत्री विजय शिवतारे, ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, दिलीप वळसे-पाटील, बबनराव पाचपुते, गणपतराव देशमुख, माजी खासदार रामशेठ ठाकूर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर आणि मान्यवर, संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य, आजीव सेवक, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या वतीने दिला जाणारा पहिला डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांना श्री. पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. श्री. पवार यांनी आज आपल्या भाषणात संस्थेची गुणवत्ता, कौशल्य विकासाची नवी दृष्टी, धोरण यावर विवेचन केले. संस्थेची आता जन्मशताब्दी साजरी केली जाणार आहे. या सोहळ्यात प्रत्येक घटकाचा सहभाग घेतला जाणार आहे. त्या निमित्ताने विधायक दृष्टी देणारा कार्यक्रम सादर केला जाणार आहे, असे सांगून श्री. पवार म्हणाले, ‘‘कौशल्य विकास, गुणवत्ता यास आता महत्त्व आहे. संस्थेत ‘सिंबायोसिस’च्या पुढाकाराने कार्यक्रम सुरू करून पुण्यात अद्ययावत केंद्र उभारणार आहे. ‘स्कील’ असलेली, चांगला लौकिक असलेली माणसे एकत्र करून महत्त्वाचा कार्यक्रम हाती घ्यावयाचा आहे.’’

शासनाचे सचिव प्रभाकर देशमुख यांच्यासारखी माणसे निवृत्त होणार आहेत. शासन त्यांच्यावर काही जबाबदारी सोपविणार का, हे पाहून अशा माणसांचा उपयोग करून घ्यायचा आहे. डॉ. अनिल काकोडकर यांच्यासारख्या माणसांची मदत घेणार असून तशी वेळ आता आली आहे.

आपण अनेक गोष्टींत सर्वांच्या पुढे गेलो आहोत. पण, सध्याच्या परिस्थितीतील गरजा आणि आव्हानांसाठी फक्त गुणवत्तेवर लक्ष द्यायचे आहे, असेही त्यांनी नमूद केले. 

प्रारंभी संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी संस्थेच्या नव्या योजनांची माहिती दिली. सहसचिव प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील यांनी आभार मानले.

‘बीव्हीजी’ चे कोर्स संस्थेत 
नवे तंत्रज्ञान, कोशल्य विकासाची आवश्‍यकता व्यक्त करून वेगळी दूरदृष्टी असणाऱ्या व्यक्तींना सदस्य म्हणून घेण्याचा विचार सांगताना ‘बीव्हीजी’ च्या हणमंतराव गायकवाड यांचा उल्लेख श्री. पवार यांनी केला. ‘‘बीव्हीजी’च्या माध्यमातून संस्थेत कोर्स सुरू करणार असून, हा कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वतीने नोकरीही दिली जाणार असल्याचे श्री. पवार यांनी यावेळी जाहीर केले.

सव्वाचार कोटींची देणगी
माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये ‘कमवा आणि शिका’ योजनेतून शिक्षण घेतले आहे. ठाकूर कुटुंब दरवर्षी संस्थेस लाखो रुपयांची मदत करत असते. त्यांनी रायगड विभागात यावर्षी सव्वातीन कोटींची एका शाळेची इमारत संस्थेला बांधून दिली. तसेच पत्नी शकुंतला आणि मुलाने आज सुमारे एक कोटी रुपयांची देणगी संस्थेस दिली.

डॉ. काकोडकर भारावले
डॉ. काकोडकर व्यासपीठाकडे येऊ लागताच त्यांचे स्वागत करायला स्वतः श्री. पवार जागेवर उठून त्यांच्यापर्यंत गेले. तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाचा पहिला पुरस्कार दिल्याने डॉ. काकोडकर भारावून गेले होते. त्यांनी संस्थेचे आभार मानले. त्यांनी आपल्या भाषणातही शिक्षण, तंत्रज्ञान आणि कौशल्य विकासाची सांगड घालण्याची गरज व्यक्त केली. नव्या तंत्रज्ञानाचा वेग वाढत असून ते स्वीकारण्यासाठी नव्या पिढीची तयारी केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, कार्यक्रमात डॉ. काकोडकर यांच्या पत्नीचा सन्मान करणे राहून गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर हे लक्षात आले. श्री. पवार यांनी सर्वांना थांबविले आणि सौ. काकोडकर यांचा टाळ्यांच्या गजरात त्यांनी सत्कार केला.

संस्थेच्या सदस्यत्वासाठी नवे प्रयत्न
दर तीन वर्षांनी संस्थेच्या कार्यकारिणीत काही सदस्य घेतले जातात. त्यासाठी संस्थेसाठी काम करणारे अनेकजण अर्ज करतात. काहीजण शिफारशी करतात. हे आता बदलायला हवे, असे श्री. पवार यांनी सुचविले. काम करणाऱ्यांची गरज आहेच; पण इतरांनी किंवा संबंधितांनीच सुचविण्यापेक्षा आता आम्हीच संस्थेचे सदस्य व्हा, अशी विनंती करणार आहे. नव्या पिढीला सक्षम घडवायचे असेल तर नवे तंत्रज्ञान, नवी कौशल्ये, नव्या दृष्टीची आवश्‍यकता आहे. या आव्हानाला तोंड देण्यासाठी वेगळ्या रस्त्याने जाण्याची गरज आहे. त्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर, जैन ग्रुप, डॉ. राम ताकवले, ‘बीव्हीजी’चे हणमंतराव गायकवाड यांसारख्या व्यक्तींना सदस्य होण्याची विनंती करणार आहे. दूरदृष्टी असलेल्या माणसांची कार्यकारिणीत गरज आहे, असे श्री. पवार यांनी स्पष्ट केले.

Web Title: rayat eeducation society center in pune for skill development