रेडिओ सिटी उभारणार ‘कोने कोने में गुढी’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

कोल्हापूर - विविध प्रश्‍नांची सोडवणूक करतानाच विधायकतेची गुढी उद्या (ता.२८) शहरातील चौकाचौकांत उभारली जाणार आहे. रेडिओ सिटीच्या वतीने यंदा पहिल्यांदाच शहरात ‘सिटी के कोने कोने में गुढी’ ही अभिनव संकल्पना राबवली जाणार असून, ‘सकाळ’ या उपक्रमाचे माध्यम प्रायोजक आहे. 

गुढी पाडव्यादिवशी आपण नवीन चांगल्या गोष्टींची सुरवात करत असतो. या चांगल्या गोष्टींची सुरवात घरापासून करत असताना सार्वजनिक गोष्टींचा ऱ्हास रोखण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे किंबहुना शहरातला प्रत्येक प्रश्‍न हा स्वतःला भेडसावणारा प्रश्‍न आहे, याची जाणीव ठेवताना त्यासाठी स्वतःचे योगदान देण्याचा संकल्प करून त्याची अंमलबजावणी करण्याचा हा चांगला मुहूर्त आहे. अशा विविध प्रश्‍नांचा जागर मांडत रेडिओ सिटी कोल्हापूरकरांना या उपक्रमात सक्रिय सहभागी करून घेणार आहे.

शहरातील सहा ठिकाणी गुढी उभारली जाणार असून, सकाळी आठ ते दहा या वेळेत हा उपक्रम होईल. बाबूभाई परीख पुलाजवळ पुलाच्या देखभाल व दुरुस्तीसाठीची गुढी सकाळी आठ वाजता उभारली जाईल. त्यानंतर राजारामपुरीतील जनता बझार येथे एकेरी मार्गाचा नियम पाळण्यासाठीची गुढी उभारली जाईल. तेथून पुढे दाभोळकर कॉर्नर येथे वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी, तर त्यानंतर खासबाग मैदान येथे पर्यटनस्थळे जतन व संवर्धनासाठीची गुढी उभारली जाईल. 

जयंती नाला येथे प्रदूषणमुक्तीची प्रार्थना करून गुढी उभारली जाईल, तर कोल्हापूरचा श्‍वास असलेल्या रंकाळ्यावर रंकाळा स्वच्छतेची गुढी उभारली जाईल. चला, तर मग आपणही सहभागी होऊ या. ‘सिटी के कोने कोने में गुढी’ उभारू या...!