पंढरपूर तालुक्‍यात शांततेत मतदान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

पंढरपूर - तालुक्‍यातील सात जिल्हा परिषद गट आणि १६ पंचायत समिती गणांसाठी आज काही किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. दरम्यान, उपरी येथील मतदान केंद्रातील एका मतदान यंत्रात बिघाड झाला होता. सुमारे दोन तासांनी मतदान यंत्र बदलून तेथे फेर मतदान घेण्यात आले.

पंढरपूर - तालुक्‍यातील सात जिल्हा परिषद गट आणि १६ पंचायत समिती गणांसाठी आज काही किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. दरम्यान, उपरी येथील मतदान केंद्रातील एका मतदान यंत्रात बिघाड झाला होता. सुमारे दोन तासांनी मतदान यंत्र बदलून तेथे फेर मतदान घेण्यात आले.

सकाळी साडेसात वाजता तालुक्‍यात सर्वत्र मतदानाला सुरवात झाली. सध्या सुगीचे दिवस असल्याने दुपारपर्यंत मतदानाचा वेग कमी होता. दुपारी दीडपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी केवळ ३२ टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर मात्र मतदान प्रक्रियेला वेग आल्याचे दिसले. दुपारी साडेतीन वाजता तालुक्‍यात जवळपास ५० टक्के मतदान झाले होते.

आमदार प्रशांत परिचारक यांनी खर्डी येथे, तर काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांनी सरकोली येथे मतदान केले.  

तालुक्‍यातील सात जिल्हा परिषद गटांपैकी केवळ कासेगाव जिल्हा परिषद गटात चुरशीने व उत्साहाने मतदान झाल्याचे पाहण्यास मिळाले. कासेगाव येथील मतदान केंद्रावर सकाळपासून महिला, पुरुष व तरुणांची रांग होती. यामध्ये वयोवृद्धांचाही सहभाग मोठा होता. येथील १०५ वर्षांच्या जिजाबाई जयवंत जाधव या आजींनी चालत येत मतदान केले. कासेगाव जिल्हा परिषद गटात आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके व पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष वसंतराव देशमुख यांच्यात अटीतटीची लढत असल्याने तेथे अतिरिक्‍त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सहायक पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे हे सर्वत्र फिरून बंदोबस्तावर लक्ष देत होते.

सरकोली येथील मतदान केंद्राच्या आवारात असलेल्या सभागृहावरील माजी खासदार सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाची पाटी न झाकता ती तशीच दुपारपर्यंत उघडीच होती. ही बाब माध्यम प्रतिनिधींच्या लक्षात आल्यानंतर मंडल अधिकाऱ्यांनी धावाधाव करून सभागृहावरील नावाची पाटी झाकली. त्यामुळे येथे आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले.

जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक ही प्रामुख्याने काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध परिचारक गटात अशी सरळ लढत झाली. निवडणुकीमध्ये विठ्ठल कारखान्याचे संचालक भगीरथ भालके, समाधान काळे, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष वसंतराव देशमुख, संचालक तानाजी वाघमोडे यांच्या पत्नी शोभा वाघमोडे, राज्य मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष प्रा. सुभाष माने, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख यांच्या पत्नी रजनी या प्रमुख उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झाले.

दुपारनंतर मतदान केंद्रांवर गर्दी
सकाळी साडेसात ते दुपारी साडेतीन या आठ तासांत ५०.१३ टक्के मतदान झाले होते. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते धावपळ करत होते. अनेक ठिकाणी लक्ष्मीदर्शनाच्या प्रतीक्षेत मतदार होते. लक्ष्मीदर्शन होताच मतदार मतदान केंद्रात येऊ लागले. दुपारी साडेचारनंतर अनेक मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी वाढल्याचे चित्र दिसून आले. लक्ष्मीटाकळी येथे गर्दी वाढल्याने गोंधळ होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन शहर पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गर्दी नियंत्रित केली. भाळवणी येथील मतदान केंद्रावर महिला पोलिस कर्मचारी व कार्यकर्त्यांत वाद झाल्याने काहीवेळ तणाव निर्माण झाला होता.

Web Title: relax voting in pandharpur tahsil