पोलिसांचा सन्मान राखा - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

कोल्हापूर - कायदा-सुव्यवस्थेबरोबरच गुन्हेगारी रोखण्यासाठी दररोज पोलिसांना लढाई करावी लागते. त्यांचा सन्मान प्रत्येकाने राखावा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. पोलिसांच्या निवासस्थानाची वचनपूर्ती केल्याबद्दल पोलिस बॉईज्‌ व कुटुंबीयांतर्फे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. पोलिस मुख्यालयात हा कार्यक्रम झाला. 

कोल्हापूर - कायदा-सुव्यवस्थेबरोबरच गुन्हेगारी रोखण्यासाठी दररोज पोलिसांना लढाई करावी लागते. त्यांचा सन्मान प्रत्येकाने राखावा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. पोलिसांच्या निवासस्थानाची वचनपूर्ती केल्याबद्दल पोलिस बॉईज्‌ व कुटुंबीयांतर्फे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. पोलिस मुख्यालयात हा कार्यक्रम झाला. 

पालकमंत्री पाटील म्हणाले, ""लष्करातील सैनिकांप्रमाणे पोलिसही काम करतात. त्यांना मूलभूत सुविधा पुरवण्याचे धोरण शासनाने स्वीकारले. गेल्या अनेक वर्षांपासून पोलिसांच्या निवासस्थानांची परिस्थिती बिकट होती. अवघ्या सात ते आठ महिन्यांपूर्वी दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता आम्ही केली. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शासकीय निधीच्या माध्यमातून आज पोलिसांच्या 600 घरांचे नूतनीकरण पूर्ण झाले. प्रत्येक घराच्या कामाबाबतचा "फिडबॅक' लिखित स्वरूपात घेतला जाणार आहे. कुटुंबीयांनी कामात काही उणिवा असतील व त्या सुधारण्याची गरज असेल तर त्या बिनधास्तपणे मांडाव्यात. त्याची तातडीने दखल घेतली जाईल. 

पोलिसांच्या मुलांसाठी सीबीएससी स्कूल सुरू करावे, अशी मागणी आहे. यासाठी उद्योगपती संजय घोडावत यांच्याशी तातडीने चर्चा करून त्यांना यात पुढाकार घेण्याची विनंती करू. पोलिस मुख्यालयात ग्रंथालय सुरू करा, अशी मागणी आहे. त्यासाठी जागेची गरज आहे. ती उपलब्ध करून दिल्यास प्रश्‍न मार्गी लावू. तोपर्यंत आपल्या विद्या प्रबोधिनीमध्ये पोलिसांच्या मुलांना मोफत प्रवेश दिला जाईल. महिला पोलिसांसाठी चेंजिंग रूमबाबतही संस्था पुढे येत आहेत, तो प्रश्‍नही मार्गी लावू.'' 

विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील म्हणाले, ""पोलिसांचे नाशिक येथे प्लेसमेंट सेंटर सुरू केले आहे. त्या आधारे 350 मुलांना औद्योगिक कंपनीत नोकऱ्या लागल्या. याचबरोबर पोलिसांच्या मुलांना सीबीएससी स्कूलची असणारी गरज पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन पूर्ण करावी.'' पोलिस कुटुंबीयांतर्फे शुभदा माने म्हणाल्या, ""वचनपूर्ती करणारे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आम्ही ऋणी आहोत. त्यांनी पुढाकार घेऊन ग्रंथालय, अभ्यासिका, योगवर्गासाठी जागा द्यावी आणि चाईल्ड केअर सेंटर सुरू करावे.'' 

त्यानंतर पोलिस बॉईज्‌ व कुटुंबीयांतर्फे पालकमंत्री पाटील यांचा महालक्ष्मीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी प्रास्ताविक केले. गृहपोलिस उपअधीक्षक सतीश माने यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी आमदार अमल महाडिक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आर. एस. पाटील, शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, करवीरचे पोलिस उपअधीक्षक हर्ष पोद्दार आदी उपस्थित होते. 

दोन वर्षांत 1200 घरे... 
गृहविभागाने पोलिसांसाठी नवीन 1200 नवीन घरे मंजूर केली आहेत. दोन वर्षांत त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्‍वासन पालकमंत्री पाटील यांनी दिले. त्याला उपस्थितांनी टाळ्या वाजवत दाद दिली. 

ट्रॅन्झिट कॅम्प... 
निवासस्थाने बांधण्यासाठी सरकारी कुटुंबे स्थलांतरित करण्यासाठी ट्रॅन्झिट कॅम्पची संकल्पना राबविली जाईल. शासकीय इमारती वापराविना पडून आहेत. अशा इमारतींचा वापर कुटुंबांच्या तात्पुरत्या स्थलांतरासाठी केला जाईल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

Web Title: Respect the police