मराठा क्रांती मोर्चाच्या बंदला संमिश्र प्रतिसाद

मराठा क्रांती मोर्चाच्या बंदला संमिश्र प्रतिसाद

जिल्ह्यातील गावागावांत निषेध फेऱ्या - सांगलीत दहा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले
सांगली - माळवाडी (भिलवडी, ता. पलूस) येथे बालिकेवरील अत्याचार व तिच्या खुनाच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या जिल्हा बंदला आज संमिश्र प्रतिसाद मिळाला. गावागावांत निषेध फेऱ्या काढून बंद पाळण्यात आला. प्रत्येक तालुक्‍यांत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

सांगलीतही सकाळी बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. संयोजक कार्यकर्त्यांनी शहरातून फेरी काढत बंदचे आवाहन केले. यात दहा कार्यकर्त्यांना विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. माळवाडीत अल्पवयीन मुलीचा अत्याचार करून खून केल्याप्रकरणी आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवावा. त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशा मागण्यांसाठी आज जिल्हा बंदचे आवाहन केले होते. त्याला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक गावांत, शहरांत कडकडीत बंद पाळण्यात आला. अत्यावश्‍यक सेवा बंदमधून वगळल्या होत्या.

सांगलीत आज सकाळी बंदला प्रतिसाद मिळाला. राजवाडा परिसर, सराफ कट्टा, गणपती पेठ, एस. टी. स्टॅंड परिसर, मारुती रोड, स्टेशन चौक, विश्रामबाग परिसर व उपनगरांत बंद पाळण्यात आला. दुपारनंतर तुरळक व्यवहार सुरू झाले. सहा महिलांनी निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांना निवेदन दिले. अमृता बोंद्रे, उषा पाटील, पूनम पाटील, दुर्गा यादव, प्रिया गोटखिंडे, ॲड. तेजस्विनी सूर्यवंशी यांचा त्यात समावेश होता.

कार्यकर्त्यांची रॅली
मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मोटारसायकलवरून रॅली काढली. राम मंदिर चौकातून स्टेशन चौक, राजवाडा चौक, पटेल चौक, गणपती पेठ, बालाजी चौक, मारुती रोड, पंचमुखी मारुती रोड, सिव्हिल हॉस्पिटल, शंभर फुटी, एमएसईबी रोड, क्रांतिसिंह नाना पाटील चौक, पुष्पराज चौकातून राममंदिर येथे समारोप झाला.

पोलिसांशी बाचाबाची
पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. राममंदिर चौकात फेरी सुरू होणार असल्याने तेथे फौजफाटा तैनात होता. सिव्हिल चौकात कार्यकर्ते बंदचे आवाहन करीत असताना पोलिसांनी कार्यकर्त्यांना विरोध करून ताब्यात घेतले. १० कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांना विश्रामबाग पोलिस ठाण्यात नेले. तेथे त्यांना जबाब घेऊन समज देऊन सोडण्यात आले.

खानापुरात कडकडीत बंद
खानापूर - येथे सर्व व्यवहार बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला. सर्वपक्षीय बंद पाळण्यात आला. दिवसभर सर्व व्यवहार ठप्प होऊन बाजारपेठेत शांतता होती.  

जतला बंद, मूक मोर्चा
जत - माळवाडी (भिलवडी) प्रकरणाच्या निषेधार्थ येथे मराठा क्रांती मूक मोर्चा रॅलीला चांगला प्रतिसाद मिळाला. शहरात बंद कडकडीत होता. विविध संघटनांनी पाठिंबा दिला. व्यापाऱ्यांनी स्वत:हून दुकाने बंद केली. बाजार असला तरी बंद कडकडीत होता. वाचनालय चौकातून मूक मोर्चा, रॅली सुरू झाली. विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. प्रांत कार्यालयासमोर नायब तहसीलदार श्री. शिंदे यांना निवेदन देण्यात आले. मच्छिंद्र बाबर, अनिल शिंदे, अरुण शिंदे, गणेश सावंत, तुकाराम चव्हाण, प्रकाश पाटील, कैलास गायकवाड, संदीप शिंदे, संग्राम शिर्के, सुनील चव्हाण, मोहन माने-पाटील, डॉ. महेश भोसले, डॉ. विजय पाटील, प्रशांत चव्हाण, गौतम ऐवळे, रमेश पवार, राजू मुल्ला, भूपेंद्र कांबळे, महादेव कोळी, मुन्ना पखाली, इराण्णा निडोणी, पापा कुंभार आदी आंदोलनात सहभागी झाले.

‘तनिष्कां’कडून देवराष्ट्रेत गाव बंद
देवराष्ट्रे - तनिष्का गटाने मूक मोर्चा काढून गाव बंद ठेवले. यशवंतराव हायस्कूलच्या विद्यार्थिनी सहभागी झाल्या. तनिष्का सदस्या मालन मोहिते यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी प्रबोधन करणार आहे, असे सांगितले.

शोभाताई होनमाने, शबाना आगा, रेश्‍मा मोहिते, रूपाली नवाळे, वंदना मदने, लता चव्हाण, सुजाता मोहिते उपस्थित होत्या.

विट्यात कडकडीत बंद
विटा - येथे विटा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त बंद पाळून पाठिंबा दिला. शहरात सर्वत्र शुकशुकाट होता. व्यवहार ठप्प होते. शहरातून निषेध फेरी काढली. शंकर मोहिते, रोहित पवार, विजय सपकाळ, अमित भोसले, दीपक शितोळे, योगेश पाटील, विद्याधर कुलकर्णी, जगन्नाथ पाटील, रवींद्र शिरसठ, दीपक पाटील, किरण पाटील, स्वप्नील बसागरे यांच्यासह सर्व पदाधिकारी व नागरिक सहभागी झाले. जिल्हा महिला दक्षता समितीच्या सदस्या आणि जनसेवा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कुमुदिनी नष्टे यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार कल्पना ढवळे यांना निवेदन दिले. शोभा राठोड, सुनीता कदम, जयश्री बोडरे, विमल सूर्यवंशी, गोदावरी नष्टे, शोभा भोरे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

दुधोंडीत कडकडीत
दुधोंडी - परिसरात बंदला सर्वच व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला. बंद ठेवून आरोपींचा निषेध केला. सामाजिक कार्यकर्ते विजय आरबुने व कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीत बंदबाबत सरपंच मच्छिद्र कारंडे यांना निवेदन दिले. औषध दुकानेही बंदमध्ये सामील झाली. व्यापाऱ्यांनी बंदला समिश्र प्रतिसाद दिल्याची माहिती विजय आरबुने यांनी दिली.

बेळंकी, सलगरेत मूक मोर्चा
सलगरे - बेळंकी, सलगरेत सर्व संघटनांच्या वतीने आज नेहरू चौकातून मुख्य मार्गावरून मूक मोर्चा काढण्यात आला. व्यापाऱ्यांनीही घटनेचा निषेध व्यक्त करून व्यापार पेठ बंद ठेवले. मोर्चात सर्व संस्थांचे पदाधिकारी, व्यापारी, तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले. 

पोलिसांची अरेरावी
नागरिक, व्यापारी बंदमध्ये सहभागी झाले. कार्यकर्ते केवळ आवाहन करीत होते. कुठेही जबरदस्ती केली जात नव्हती. तरीही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. नंतर पोलिसांनी दुकाने उघडण्यास सांगितले. बंद हाणून पाडल्याचा दावा करीत असल्याचा आरोप संयोजक डॉ. संजय पाटील यांनी केला.

परस्पर विरोधी दावे
आजचा बंद हाणून पाडल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे; तर बंदला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचा दावा संयोजकांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com