शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल घसरला 

राजेंद्र पाटील
गुरुवार, 18 मे 2017

शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर केला असून जूनच्या तिसऱ्या अथवा चौथ्या आठवड्यात अंतिम निकाल व गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.
- स्मिता गौड सहायक आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद.

कोल्हापूर - राज्य परीक्षा परिषदेने आज इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल ऑनलाइन जाहीर केला. यात या वेळी राज्याचा निकाल घसरल्याचे दिसून आले. पाचवीचा २१.४३  तर आठवीचा केवळ १३.४५ टक्के इतका निकाल लागला आहे. 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषेदेने चौथी व सातवीऐवजी या वर्षीपासून पाचवी व आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचे सुरू केले. या वर्षी घेतलेल्या परीक्षेचा आज ऑनलाईन निकाल लागला.  शिष्यवृत्ती परीक्षेसाठी दोन्ही इयत्तासाठी दीडशे गुणांचे दोन पेपर होते. दीडशेपैकी ६० गुण मिळाल्यास तो विद्यार्थी उत्तीर्ण होतो. पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ५,२६,५७९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी १,१२,८५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आठवी परीक्षेसाठी ३,९०,८५५ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ५२,५६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेचा बदललेला अभ्यासक्रम, परीक्षेचे बदललेले स्वरूप विद्यार्थ्यांना प्रथमच दिलेल्या ए.बी.सी.डी. अशा बहुसंच प्रश्‍नपत्रिका, इयत्ता आठवीसाठी वीस टक्के प्रश्‍नांना नोंदवावे लागणारे दोन अचूक पर्याय आदी कारणांमुळे या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल घसरला आहे.
शासनाने आज www.mscepune.inwww.puppss.in  या परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर केला आहे.

ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घ्यावयाची असेल व उत्तरपत्रिकांची डिजिटल स्कॅन प्रत हवी असल्यास ३१ मेपर्यंत ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या नावात, आडनावात, आईवडिलांचे नावात, जातसंवर्ग आदीमध्ये दुरुस्ती असलेस आवश्‍यक पुराव्यासह शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत परीक्षा परिषदेकडे ३१ मे पूर्वी ई-मेल किंवा पोस्टाद्वारे अर्ज करावे, असे आवाहन परीक्षा परिषदेने केले आहे.