सर्जा- राजाच्या जोडीला ‘अच्छे दिन’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

शर्यतीवरील बंदी उठल्याने खिलार बैलांचा भाव वधारला

शर्यतीवरील बंदी उठल्याने खिलार बैलांचा भाव वधारला
रेठरे बुद्रुक - बंदी उठल्यामुळे ग्रामीण भागाचे भूषण असलेल्या सर्जा- राज्याच्या जोडीला ‘अच्छे दिन’ पाहायला मिळणार आहेत. बैलगाडी शर्यतींमध्ये खिलार बैलांचाच दबदबा राहतो. मागील चार वर्षे शर्यतीवरील बंदीने ही व्यवस्थाच कोलमडली होती. शर्यतींचा मार्ग मोकळा झाल्याने बैलांच्या जोपासनेला गतवैभव प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या किमतीदेखील वधारतील. गेल्या २० वर्षांत प्रगत तंत्राबरोबर यांत्रिकतेचा देखील शेतीत वावर वाढला आहे. त्या अगोदर बहुतांश शेती बैलांच्या साहाय्याने कसली जायची. त्यामध्ये खिलार वळू, खोंड व बैलांना खूप महत्त्व होते. त्यामुळे प्रत्येकाच्या गोठ्यामध्ये बैलजोडी हे चित्र ठरलेले होते; परंतु यांत्रिकीकरणाच्या झपाट्यात बैलजोड्यांचे महत्त्व कमी होत गेले, तरीदेखील काही कष्टाळू शेतकरी बैलांकडूनच शेतीच्या मशागती करून घेतात. शेतीसाठी बैलजोडी सांभाळताना शेतकऱ्यांना जातिवंत जनावरे पाळण्याचा छंद लागला. त्यातून बैलजोडी जोपासणे ही ग्रामीण संस्कृतीच बनलेली पाहायला मिळते. गावोगावच्या जत्रांमध्ये बैलगाडी शर्यती ठरलेल्या होत्या. त्या पाहण्यासाठी लांब पल्ल्याहून शौकीन यायचे. त्यामुळे हीच संस्कृती काही काळ जणू उत्सवच साजरा करायची. बैलपोळा व धुलीवंदनला तर या बळिराजाच्या जोडीला शेतकरीही सजायचा. बैलांच्या जपणुकीमुळे साधारण २० वर्षांपूर्वी बैलगाडी शर्यतींना सोन्याचे दिवस होते. पळणाऱ्या बैलांना मोठी किंमत मोजण्यासही शेतकऱ्यांची तयारी असायची.

जोपासलेल्या खोंडांना सराव देऊन शर्यतींमध्ये उतरवले जायचे. एखाद्या- दुसऱ्या शर्यतीत तो खोंड नामांकित झाला, की त्याची किंमत दोन ते पाच लाखांपर्यंत जायची. त्यातून हे खिलार बैल नावारूपास यायचे. त्यामुळे इतर राज्यातही त्यांना मागणी राहायची. तो काळ बैलांच्या वैभवाचा सुवर्णकाळ राहिला. बैलगाडी शर्यतींवर चार वर्षांपूर्वी बंदी घातल्याने एकूणच हे वैभव अडचणीत आले. बंदी उठल्यामुळे आता पुन्हा या सर्जा- राज्याच्या जोडीला गतवैभव मिळल्याने त्यांना अच्छे दिन पाहायला मिळणार आहेत.

बैलगाडी शर्यतींवरील बंदी उठल्याने शेतकऱ्यांच्या खिलार बैलांना चांगले दिवस आले आहेत. बंदीमुळे शेतीचे गणितही चुकले होते. खिलार बैले ही शेतकऱ्यांची शान आहे. तेच शेतकऱ्याला प्रतिष्ठा मिळवून देतील.
- नितीन दहिभाते, शेतकरी व खिलार बैलांचे जोपासक, शेरे (ता. कऱ्हाड)