सांगलीनंतर महसूलमंत्र्याचे साताऱ्याकडे लक्ष! 

सांगलीनंतर महसूलमंत्र्याचे साताऱ्याकडे लक्ष! 

कऱ्हाड : कॉंग्रेस व राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या कऱ्हाड तालुक्‍यातील दक्षिण व उत्तर विधानसभा मतदारसंघात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे दोन दिवसांपासून दौऱ्यावर आहेत. दोन्ही कॉंग्रेसला थेट आव्हान देताना त्यांच्या संघटनात्मक बांधणीला तोडून लोकांना आपल्याकडे वळवण्याची हातोटी त्यांनी अवलंबली आहे. त्याचे नेमके परिणाम हे यथावकाश निवडणुकीत दिसणार आहेत. 

महसूलमंत्री पाटील उद्याही (बुधवारी) येथील विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावत आहेत. कार्यकर्त्यांच्या भेटींसह जनतेशी थेट नागरिकांशी त्यांनी संवाद साधण्याचे धोरण अवलंबलेले आहे. सांगली महापालिकेतील विजयानंतर सातारा जिल्हा असे मंत्री पाटील यांनी जाहीर केले होते. त्याचीच प्रचिती त्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने येऊ लागली आहे. कऱ्हाड दक्षिणेसह उद्या होणाऱ्या अन्‌ उत्तरेत काल झालेल्या कार्यक्रमांना भाजपच्या संघटनात्मक वाढीचीच झालर आहेच. निमित्त कोणत्याही कार्यक्रमाचे असले तर भाजमय वातावरण निर्मिती करून लोकांना आपल्याकडे खेचण्याची त्यांची खेळी आहे. जिल्ह्यात विशेष करून कऱ्हाड दक्षिण व उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याची एकही संधी मंत्री पाटील सोडताना दिसत नाहीत. भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी विक्रम पावसकर, विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी अतुल भोसले, सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी शेखर चरेगावकर यांच्या केलेल्या नियुक्‍त्या संघटनात्मक बांधणीचेच द्योतक आहेत. त्याचाच परिणाम पालिकेच्या निवडणुकीत दिसला. भाजपने नगराध्यक्षपदाला गवसणी घालून पालिकेत सत्ताही आणली. 

कऱ्हाड दक्षिणेत कॉंग्रेस तर उत्तरेत राष्ट्रवादी बळकट आहे. मात्र, त्या दोन्ही कॉंग्रेसच्या संघटनात्मक वादाच्या दुखत्या नसा शोधून मंत्री पाटील यांनी केलेले दौरे विशेष महत्त्वाचे मानले जात आहेत. भाजपला दोन्ही ठिकाणी पोषक स्थिती आहे. अनेक कार्यकर्ते संपर्कामध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत. दोन्ही कॉंग्रेसला विरोधी गट कायम आहे. त्यांच्यात पक्षांतर्गत वादही आहे. त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून भाजपने मंत्री पाटील यांच्या माध्यमातून कऱ्हाड शहरासह दक्षिण व उत्तर विधानसभा मतदारसंघात पक्षबांधणीला सुरवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालिकेचे माजी उपाध्यक्ष व यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्र यादव यांच्या वाढदिवसाला उपस्थित राहणार आहेत. त्याच कार्यक्रमात पक्षाने नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कारही होणार आहे. असे पक्षाचे सकारात्मक वातावरण लक्षात घेऊन प्रत्येक विभागातील कार्यकर्त्यांसह सामान्य लोकांच्या भेटीगाठी घेण्यासाठी महसूलमंत्री पाटील गावागावांत व वाड्यावस्त्यांवर फिरत आहेत. उत्तरेतील मसूरसह चोरेसारख्या गावात त्यांनी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांना उपस्थिती लावली. तेही दोन्ही कॉंग्रसेने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. त्याचा परिणाम दोन्ही कॉंग्रसेच्या गटबांधणीवर किती होणार, ते येणारा काळ ठरवणार असला सध्या तरी दोन्ही कॉंग्रसेसह विधानसभा मतदारसंघातील वातावरण ढवळून निघाले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com