रिंकूचा 'सैराट' चाहता पोलिसांच्या जाळ्यात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

दत्तात्रय घरत याने रिंकूची छेड काढलेली नाही. केवळ तिला भेटण्यासाठी तो येत होता. एखाद्या व्यक्तीचा इच्छा नसताना तिला भेटण्याचा प्रयत्न करणे, हा कायद्याने गुन्हा आहे. त्या तरतुदीनुसार त्याला अटक केली आहे. उद्या त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. 
- संजय सुर्वे, पोलिस निरीक्षक

अकलूज - तिच्या जिंदादिल अभिनयाने त्याच्या काळजावर वार केला. तिच्या अभिनयाची भुरळ त्याला पडली. झिंगाट झालेला हा चाहता सैराट होऊन अकलूजला चकरा मारू लागला. आपल्या लाडक्‍या अभिनेत्रीला भेटण्यासाठी त्याची धडपड सुरू झाली. मात्र, तिची भेटण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे अखेर त्याची गाठ पोलिसांशी पडली आणि रिंकू राजगुरूच्या या चाहत्याची आज पोलिस कोठडीत रवानगी झाली आहे. दत्तात्रय घरत असे त्याचे नाव आहे. 

बहुचर्चित सैराट चित्रपटाची नायिका रिंकू राजगुरू हिचे अनेक चाहते आहेत. रूपेरी दुनियेतील पदार्पणातच तिने अलौकिक यश मिळविले आहे. या अभिनेत्रीला भेटण्यासाठी अनेकजण धडपडत असतात. सैराट चित्रपटातील तिचा अभिनय पाहून चाहता झालेला ठाणे जिल्ह्यातील 33 वर्षीय युवक सतत अकलूजला येत होता. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्‍यातील सरळगाव येथील या व्यक्तीचे नाव आहे दत्तात्रय घरत. आज पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दत्तात्रय घरत हा सतत अकलूजला येत होता. रिंकूच्या पालकांकडे रिंकूला भेटण्याची इच्छा व्यक्त करीत होता. मात्र, त्याची आणि रिंकूची कधी भेटच झाली नाही. आज तिला कोणत्याही परिस्थिती भेटायचेच असा निश्‍चय करून तो अकलूजला आला होता.

रिंकूचा आज दहावीचा हिंदीचा पेपर होता. ती शाळेत असताना तो शाळेच्या प्रवेशद्वारावर थांबला होता. मात्र, त्याची आणि रिंकूची भेट झाली नाही. दरम्यान, ही बाब रिंकूच्या पालकांना समजल्यावर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. उद्या त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. दतात्रय घरत हा हॉटेलमध्ये काम करतो. सैराट चित्रपट पाहिल्यापासून रिंकूला समक्ष भेटायची त्याची इच्छा होती. त्यासाठी तो वारंवार अकलूजला येत असल्याचे सांगितले जात आहे. 

दत्तात्रय घरत याने रिंकूची छेड काढलेली नाही. केवळ तिला भेटण्यासाठी तो येत होता. एखाद्या व्यक्तीचा इच्छा नसताना तिला भेटण्याचा प्रयत्न करणे, हा कायद्याने गुन्हा आहे. त्या तरतुदीनुसार त्याला अटक केली आहे. उद्या त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. 
- संजय सुर्वे, पोलिस निरीक्षक