रस्ते खोदकामांमुळे मिरजेत दीड हजारांवर दूरध्वनी बंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

मिरज - शहरात ड्रेनेज आणि पाणीपुरवठा योजनांच्या खोदकामांमुळे नागरिकांची डोकेदुखी वाढलेली असतानाच दूरसंचार विभागाचेही लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. दोन महिन्यांत केबल तोडण्याने दीड हजारांवर दूरध्वनी ठप्प झाले. बीएसएनएलने तातडीने कार्यवाही करीत यंत्रणा पूवर्वत केली. परंतु, यादरम्यान नागरिकांना मनस्ताप सोसावा लागला. 

शहरात दोन वर्षांपासून सातत्याने खोदकामे सुरू आहेत. खड्डे, धूळ, बंद रस्ते आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिक मेटाकुटीला आलेत. ड्रेनेज खोदाईची कामे संपल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. तत्पूर्वीच पाणीपुरवठ्याची खोदकामे सुरू झाली. या कामांमुळे सध्या मिरजकरांना हैराण करून सोडले आहे. हजारो रहिवाशांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष छळ सोसावा लागत आहे. खोदकामाच्या यंत्रांनी अनेकवेळा दूरध्वनीच्या केबल तोडून संपर्क यंत्रणा उद्‌ध्वस्त केल्याच्या घटना घडल्या. शिवाजी रस्त्यावर सरासरी आठवड्याला एकदा केबल तोडण्याचे प्रकार घडले. या रस्त्यावर बॅंका, पंचायत समिती अशा अनेक शासकीय-निमशासकीय संस्था आहेत. त्यांची संपर्क यंत्रणा ठप्प झाली. इंटरनेट सेवा बंद पडली. दिंडीवेस, मंगळवार पेठ, सुभाषनगर रस्ता, गांधी चौक इत्यादी ठिकाणीही मनमानी खोदकाम करीत दूरध्वनीच्या केबल तोडल्या. बीएसएनएलने दोनवेळा दंड ठोठावूनही स्थितीत सुधारणा झाली नाही. दोन्ही विभागांच्या कर्मचाऱ्यांत दोनवेळा हाणामारीचे प्रकार घडले. बीएसएनएलने फौजदारी कारवाया मात्र टाळल्या.  
केबल तोडण्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. केबल जोडून दूरध्वनी पूर्ववत करण्याचे काम युद्धस्तरावर झाले. त्यानंतरही काही ग्राहकांनी दूरध्वनीला कायमचा रामराम ठोकला. यात दूरसंचार विभागाचे मोठे नुकसान झाले. शहरात अजूनही अनियंत्रित खोदकामे सुरू आहेत. पिण्याच्या पाण्याच्या पाईप उचकटल्या जात आहेत. कधी एकदा खोदकामे संपतात, याची नागरिकांना प्रतीक्षा आहे.

Web Title: road digging telephone close